-एक सदस्यीय प्रभाग पध्दतीने महापालिका निवडणूक होणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकांच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपत आहे.या पार्श्वभूमीवर या दोन्ही महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या पूर्वतयारीसाठी व कच्चे प्रारुप तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे.निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून प्रभार रचनेची पूर्वतयारी करण्यास सांगितले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 संपत आहे.यामुळे आयोगाच्या विहित वेळापत्रकानुसार महापालिकेची प्रभाग रचना एप्रिल 2020 मध्ये होणे आवश्यक होते.पण कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व निवडणूकांचे टप्पे स्थगित करण्यात आले.यामुळे महापालिकेची निवडणूकीसंदर्भातील कोणतीच प्रक्रिया झाली नाही.
दरम्यान,शासनाने मिशीन बिगीन अगेन (अनलॉक 1) सुरु केले आहे. त्याप्रमाणे अटी,शर्थींचे पालन करत शासकीय,खासगी कार्यालये,व्यवसाय,शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयात बसून होणाऱया व जनतेशी संपर्क नसणाऱया अशा निवडणूकांच्या टप्यातील कामकाज करता येईल असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे.या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेची पूर्वतयारी व कच्चे प्रारुप तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शनिवारी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 2019 नुसार महापालिकेच्या निवडणूकीसाठी एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.महापालिका हद्दीत अथवा लोकसंख्येमध्ये बदल झाले असतील तर त्यानुसार सुधारित आकडेवारी विचारात घेऊन,सदस्यसंख्या व आरक्षण निश्चिती, प्रारुप तयार करावे असे म्हटले आहे.तसेच कच्चा आराखडा तयार होताच आयोगास कळवण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या पूर्वतयारीला मंजुरी दिल्यामुळे कोल्हापूरात लवकरच निवडणूकीचे पडघम वाजणार आहेत.