प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून 253 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे.त्यापैकी 1 एप्रिल ते आजअखेर 40 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.वसुलीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी महापालिकेकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या कर आकारणी वसुली विभागाकडील चालू वर्षातील मागणी 90 टक्के तर थकबाकी 50 टक्के वसुली करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष वसुली पथके तयार करण्यात आली आहेत.अशी चार पथके असून प्रत्येक विभागीय कार्यालयाकडील अन्य पथके आहेत.चालू मागणी 52 कोटी 7 लाख,दंडासह थकबाकी 112 कोटी,दंड आणि व्याज 86 कोटी आणि शास्ती 2 कोटी 99 लाख रुपये असे एकूण 2021 चे 253 कोटी रुपयांचे लक्ष्य आहे अशी माहिती सहायक आयुक्त औंधकर यांनी दिली.त्याप्रमाणे 1 एप्रिल 2020 ते आजअखेर 40 कोटी रुपये वसूल झाले आहेत.त्यापैकी चालू मागणीतील 28 कोटी 68 लाख आणि थकबाकीतील 10 कोटी 14 लाख रुपये वसूल झाले आहेत.जानेवारी 2021 मधील 18 जानेवारी पर्यंत 2 कोटी 29 लाख रुपये जमा झाले आहेत.
महापालिकेच्या कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.या आयोगाची अंमलबजावणी पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.पण यासाठी चालू आर्थिक वर्षातील 90 टक्के व थकबाकी 50 वसुली झाली पाहिजे.
शास्तीची चौकशी सुरु-
अनधिकृत बांधकामांना दंड लावण्यात आला आहे.बिलामध्ये हा दंड(शास्ती)दिसतो.पण सिस्टममध्ये हा दंड दिसत नाही.यामुळे शास्तीची वसुली झाली नाही.या मागच्या कारणांचा शोध घेऊन चौकशी सुरु आहे.तसेच मार्च नंतर इनव्हॅलिड मिळकतींचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी सांगितले.