राज्यस्तरीय सक्षम अधिकारी पुरस्काराने गौरव
प्रतिनिधी / कोल्हापूर
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना अविष्कार सोशल ऍण्ड एज्यूकेशन फौंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय सक्षम अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला.
शिक्षणाधिकारी लोहार हे शैक्षणिक क्षेत्रात प्रशासक आणि अधिकारी म्हणून सन २०१३ पासून सक्षमपणे कार्यभार सांभाळत आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव, कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार अशी प्रशासकीय पदे सांभाळली आहेत. ऑगस्ट २०१८ पासून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून ते सक्षमपणे कार्यरत असून कोल्हापूर जिह्यातील शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम व योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत. सर्व सामान्य विद्यार्थ्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या कौशल्याचे प्रभावी सहकार्य घेऊन शैक्षणिक विकासाचे प्रयत्न करत आहेत. भारत स्काउटस् आणि गाईडस, कोल्हापूरचे मुख्य आयुक्त म्हणून स्काउट-गाईडस चळवळ सक्षम बनवणेसाठी आपल्या प्रशासकीय अनुभवाचा यशस्वी वापर केला असून जिह्यात या चळवळीच्या प्रचार ,प्रसारासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेवून राज्यस्तरीय सक्षम अधिकारी पुरस्कार दिला आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी सुजाता लोहार, निखिल लोहार यांच्यासह कुटूंबिय उपस्थित होते.