प्रतिनिधी/पन्हाळा
लॉकडाउनमुळे तीन महिन्यांची सरासरी वीज बिले हाती पडताच ग्राहक हैराण होत आहेत. त्यात 1 एप्रिलपासून विजेचा नवीन दर लागू झाला आणि वीज बिलात वाढ झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वीज बिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. एकीकडे इतर राज्यात वीज बिले माफ व सवलत मिळत असताना दुसरीकडे वाढून आलेल्या बिलामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्यांची आर्थिक घडी फिस्कटल्याने वाढीव बीले भरायची कशी असा प्रश्न उपस्थित होत असुन लॉकमधील बील माफ व्हावी अशी मागणी पन्हाळा तालुक्यातील जनतेतुन होत आहे.
पन्हाळा तालुक्यासह सर्वत्र लॉकडाउनमध्ये महावितरणने मीटरचे रिडिंग घेतलेच नाही. आवाहनानुसार काहींनी ऑनलाईन महावितरण ऍपवर रिडिंग घेऊन अपलोड केले, पण मोठ्या प्रमाणात तालुक्यातील ग्राहकांनी रिडिंगच अपलोड केले नाही. त्यामुळे महावितरणने ग्राहकांना मार्च, एप्रिल, मे महिन्याची सरासरी वीज बिले दिली; पण ही वीज बिले अपेक्षेपेक्षा वाढीव रकमेने ग्राहकांच्या हाती पडली. अशी वीज बिले कोणत्या आधारावर काढली. कमी येणारे बिल जास्त कसे आले, अशी विचारणा तालुक्यातील ग्राहकांतून वाढली आहे. सरासरी वीज बिलाबाबत महावितरणचे अधिकारी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करत आहेत, पण सध्या सरासरी वीज बिले ग्राहकांची डोकेदुखी बनली आहे.
वाढीव बिलात स्लॅबचा फटका
प्रत्येक महिन्याला येणारे बिल हे युनिट मर्यादेनुसार निश्चित केलेल्या स्लॅबप्रमाणे येत असे; पण सध्या लॉकडाउनमुळे तीन महिन्यांचे एकत्रित युनिट सरासरी आल्याने जादा स्लॅबने महावितरणने बिले काढली, अशी तक्रार ग्राहकांतून होत आहे. तसेच तीन महिन्यांची वेगवेगळी बिले द्यावीत तरच आम्ही भरतो, अशी मागणी पन्हाळ्यातील नागरिकांच्यातुन होत आहे.
पन्हाळा तालुका हा दुर्गम व डोंगराळ आहे.तालुक्यातील बरेच लोक हे बाहेर गावी कामाला आहे.पण सध्या कोरोना या महामारीमुळे सर्वत्र मंदी असल्याने कामांची टंचाई आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले असुन त्यात प्रमाणापेक्षा जास्त वाढीव बील आल्याने ती बील भरावयाची कशी..?तसेच पन्हाळगडवर पर्यटन ठप्प असुन गडावरील बहुतांशी लोकांचा उदरनिर्वाह हा पर्यटन व्यवसायावर चालु असतो.पण सध्या पन्हाळा बंद असुन दैनंदिन गरजा भागवताना येथील सर्वसामान्यांची फरफट होत आहे. तरी सदरची वाढीव वीज बीले माफ व्हावी अशी मागणी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अमरसिंह भोसले, माजी नगरसेवक अख्तर मुल्ला यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
Previous Articleदेशहित धाब्यावर
Next Article आयसीआयसीआय देणार कोटीपर्यंतचे शैक्षणिक कर्ज
Related Posts
Add A Comment