गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22 टक्के अधिक जीएसटी जमा
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागात महत्वाची भूमिका पार पाडणाऱया कोल्हापूर विभागाने 2021-2022 या आर्थिक वर्षांत विक्रमी जीएसटी संकलन केले आहे. फेब्रुवारी अखेर 2535 कोटी रूपयांचा जीएसटी महसूल रूपाने गोळा करण्यात आला आहे. 2020-2021 मध्ये फेब्रुवारी अखेर 2022 कोटी रूपये जीएसटी जमा झाला होता.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम तसेच विविध कारणांमुळे जागतिक पातळीवर असणारी मागणीमधील कमतरता या पार्श्वभूमीवर देखील 2021-2022 या आर्थिक वर्षांत 31 टक्के इतका वृद्धीदर प्राप्त करण्याची कामगिरी जीएसटीच्या कोल्हापूर विभागाने बजावली आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याचे संकेत मिळू लागले. लॉकडाऊन होणार नाही, याची खात्री पटल्याने व्यवसाय जगताते नव्या उमेदीने सुरूवात केली. याचवेळी जीएसटी कोल्हापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे सुनीता पाटील-थोरात यांनी स्वीकारली. त्यांनी कार्यभार हाती घेताच सुयोग्य नियोजन करून जीएसटी संकलनासह विविध कामांना चालना दिली. त्याचा जीएसटी वसुलीवर सकारात्मक परिणाम झाला.
जीएसटी भरताना बनावट बिले तयार करणाऱयांवर कडक कारवाई, विवरण पत्रक न भरणाऱया व्यापाऱयांची नोंदणी रद्द करणे, बँक खाते गोठविणे आदी कारवाया वेगाने सुरू करण्यात आल्या. तसेच ई वे बिलाशिवाय माल वाहतूक करणाऱया व्यापाऱयांविरोधात दंडाची व मालाच्या जप्तीची कारवाई करण्यात आल्या. मोठय़ा प्रमाणावर कर चुकवेगिरी करणाऱया व्यापाऱयांविरूद्ध अंमलबजावणी शाखेमार्फत धाडी टाकण्यात आल्या. प्रलंबित थकबाकीच्या वसुलीवर वेषेश वसुली मोहीमही राबविण्यात आली. त्यामुळे गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22 टक्के इतक्या मोठय़ा प्रमाणात जीएसटी संकलनात वाढ झाली.
जीएसटी विभाग कोल्हापूरमध्ये पाच जिल्हे
जीएसटी विभाग कोल्हापूरमध्ये कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्हय़ांत गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक जीएसटी संकलन झाले आहे.