कृष्णात चौगले / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्या तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध प्रयत्न सुरु आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियांचे शिक्षणात अनन्यसाधारण महत्व आहे. सद्यस्थितीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असली तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा, शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासासाठी देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे व विद्यार्थ्याला शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी, पाहिजे तेंव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गूगल क्लासरूम ही सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अंतर्गत प्रत्येक शिक्षकास, विद्यार्थ्याला शाळेसाठी GSuite आय.डी तयार करुन देण्यात येणार आहेत. याच्या सहाय्याने शिक्षक एकावेळी कमाल 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका घेऊ शकतात. ही तासिका रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना कधीही पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत. याअंतर्गत शिक्षकांसाठी अनलिमिटेड स्टोरेजचे GSuite आय.डी व विद्यार्थ्यांसाठी काही कमाल मर्यादा असणारे GSuite आय.डी व पासवर्ड देण्यात येणार आहेत. ज्याचा वापर करून गूगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया अधिक संरचित माध्यमातून सुरु राहू शकते. ‘गूगल’मार्फत केवळ ‘गूगल क्लासरुम हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे आणि शिक्षक व विद्यार्थी यांचा डेटा केवळ शालेय शिक्षण विभागाकडे राहणार आहे.
या सुविधा राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी उपलब्ध होणार असली तरी पहिल्या टप्यात राज्यस्तरावरून राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील तंत्रस्नेही शिक्षकांसाठी गूगल क्लासरूमचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यांनतर पुढील टप्यात खासगी अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, खासगी विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात 40 हजार शिक्षकांना प्रशिक्षणाची संधी
गूगल क्लासरुमच्या प्रशिक्षणासाठी प्राधान्याने पहिल्या टप्प्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील ज्या तंत्रस्नेही शिक्षकांकडे इंटरनेट सुविधेसह डेस्कटॉप संगणक, इंटरनेट सुविधेसह लॅपटॉप अथवा फक्त प्रशिक्षण कालावधी पुरते ज्यांना इंटरनेट सुविधेसह दोन स्मार्टफोन उपलब्ध होऊ शकतील अशा शिक्षकांनी https://google.addingdimensions.in/Home.aspx या लिंकवर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी. हे प्रशिक्षण सुमारे 3 तासांचे असेल. पहिल्या टप्यात राज्यस्तरावरून 40,000 शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यानंतर तालुकास्तरावरून उर्वरित शिक्षकांसाठी देखील गूगल क्लासरुमचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी आज रात्री 11.55 पर्यंत नाव नोंदणी आवश्यक
या लिंकवर नावनोंदणी केल्यावर संबंधित शिक्षकास प्रशिक्षणाच्या मार्गदर्शक सूचना कळतील. तसेच एसएमएसद्वारे त्यांना गूगल क्लासरूमचा आय.डी, पासवर्ड व प्रशिक्षणाचा तपशील कळणार आहे. तरी पहिल्या टप्प्यातील पात्र व इच्छुक शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी तत्काळ नाव नोंदणी करावी. सोमवारी (13 जुलै 2020) रात्री 11.55 वाजता नाव नोंदणी बंद करण्यात येणार आहे.