प्रतिनिधी / कोल्हापूर
अवसायनात निघालेल्या सुतगिरणीच्या 11 एकर जमिनीचे मुल्यांकन कमी करण्यासाठी 45 लाखांची लाच मागून 20 लाखांचा पहिला हप्ता स्विकारताना सहाय्यक नगर रचनाकारास शुक्रवारी लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. गणेश हणमंत माने (वय 47 सध्या रा. प्लॉट नं 220 हरिओमनगर, 15 वी गल्ली मुळ रा. जोशी गल्ली, शनिवार पेठ) असे त्याचे नांव आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातील चहा टपरीवर 20 लाखांची लाच स्विकारताना गणेश माने रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जिह्यातील एका सुतगिरणीचे चेअरमन आहेत. ही सुतगिरणी अवसायानात निघाली आहे. या संस्थेच्या मालकीची 11 एकर जागा जिह्यातील ग्रामीण भागात आहे. हि सहकारी संस्था अवसायानात निघाल्यामुळे संस्था व संस्थेची सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली आहे. मात्र संस्थेची जमिन अद्यापही संस्थेचे चेअरमन यांच्या नावावर आहे. सातबारा पत्रकावरही त्याच चेअरमनचे नाव आहे. संस्थेच्या संचालक मंडळास सुतगिरणीची नोंदणी रद्द करावयाची आहे. यामुळे संस्थेच्या मालकीच्या एकूण जमिनीपैकी 11 एकर जमिनीचे शासकीय मुल्यांकन करण्यासाठी संस्थेचे चेअरमन यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 ऑक्टोंबर 2020 रोजी अर्ज केला होता. सदरचे मुल्यांकन लवकरात लवकर करुन त्याचा दाखला मिळावा यासाठी संस्थेचे चेअरमन वारंवार मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट घेत होते. यानंतर चेअरमननी सहाय्यक नगर रचनाकार गणेश माने यांची भेट घेतली.
यावेळी तक्रारदारांनी गणेश माने याच्याकडे सदरच्या जमिनीचे मुल्यांकन कमी करुन त्याचा दाखला लवकरात लवकर द्यावा अशी मागणी केली. 21 जानेवारी रोजी तक्रारदाराने गणेश माने याची पुन्हा भेट घेतली असता जागेचे मुल्यांकन करुन त्याची किंमत सरकारी भावापेक्षा कमी दाखवण्यासाठी 45 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. यानंतर 22 जानेवारी रोजी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत विभागाने 1 फेब्रुवारी रोजी सापळा रचून मिलच्या 11 एकर जागेचे मुल्यांकन कमी करुन दाखला देण्यासाठी 45 लाखांपैकी 20 लाखांचा पहिला हप्ता द्यावा लागेल उर्वरीत 25 लाख दिल्यानंतर दाखला देण्यात येईल याबातची पडताळणी केली. तसेच 20 लाखांची रक्कम घेवून शुक्रवारी दुपारी 2 भेटण्याचे निश्चीत करण्यात आले. यानुसार तक्रारदारांनी दुपारी 2 वाजता 20 लाख रुपयांसह गणेश माने यांची शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये जावून भेट घेतली. माने याच्या कार्यालयात बोलणी झाल्यानंतर तक्रारदार व माने दोघेही चहा टपरीवर चहा घेण्यासाठी गेले. याठिकाणी लाचेची रक्कम स्विकारताना गणेश माने यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपतच्या अधिकाऱयांनी जेरबंद केल्यानंतर माने याने मला का पकडत आहे अशी विचारणा केली. यावेळी तु लाच घेताना सापडला आहेस असे सांगताच माने याच्या पायाखालची वाळू सरकली.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार संजीव बंबर्गेकर, पोहेकॉ. शरद पोरे, पोना नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर, मयुर देसाई, सुरज अपराध यांनी ही कारवाई केली.
दरम्यान गणेश माने याच्या हरिओमनगर येथील घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. लाचेची रक्कम मोठी असल्याने पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत स्वतः घरझडती घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अमर भोसले, कृष्णात पाटील, विकास माने, संदिप पडवळ यांनी घरझडती घेतली.
हॉस्पिटलसाठी जागा खरेदी
अवसायानात निघालेल्या त्या संस्थेचा एक पदाधिकारीच संस्थेची जमिन खरेदी करण्यासाठी इच्छूक आहे. तो पदाधिकारी संस्थेच्या अकरा एकर जमिनीवर हॉस्पिटल उभारणार होता. अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
कोल्हापूरातील सर्वात मोठी कारवाई
लाचलुचपत विभागाने शुक्रवारी केलेली कारवाई ही कोल्हापूर जिह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. यापुर्वी मत्स्य विभागामध्ये प्रदिप सुर्वे 5 लाख, आयकर विभागामध्ये आयकर अधिकारी चव्हाण 10 लाख रुपये घेताना अटक करण्यात आले होते. शुक्रवारी गणेश माने याला 20 लाखांची लाच घेताना अटक केले. ही जिह्यातील सर्वात मोठी कारवाई ठरली.
पहिला हप्ता
जागेचे मुल्यांकन कमी करुन त्याचा दाखला देण्यासाठी 45 लाख रुपयांची मागणी गणेश माने याने केली होती. यातील 20 लाखांचा पहिला हप्ता ऍडव्हान्स स्वरुपात देण्याचे ठरले होते. तर उर्वरीत 25 लाख काम झाल्यानंतर देण्याचे फायनल करण्यात आले होते. मात्र पहिला हप्ता देतानाच गणेश माने याला जेरबंद करण्यात आले.
पाचशेच्या 3800 नोटा
तक्रारदाराने गणेश माने यास देण्यासाठी 20 लाख रुपये एका हँडबॅगमधून आणले होते. यामध्ये 500 च्या 3 हजार 800 नोटा तर 2 हजार च्या 50 नोटा ठेवण्यात आल्या होत्या. चहाच्या टपरीवर एका हँडबॅगमध्ये ही रक्कम माने याने स्विकारली.