सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खळबळ, पती, मुलांना केले क्वारंटाईन
प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड वॉर्डमध्ये सेवा बजावलेल्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गुरुवारी रात्री तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच तिला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
सदाशिवनगर येथील 31 वषीय परिचारिका 28 जूनपर्यंत कोविड वॉर्डमध्ये सेवा बजावत होती. त्यानंतर पाच दिवसांनी तिची स्वॅब तपासणी झाली होती. गुरुवारी रात्री उशीरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिचा पती, दोन मुलांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिचारिका राहत असलेल्या सदाशिवनगर येथील घराजवळ खबरदारी वाढविण्यात आली आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ व त्यांच्या सहकाऱयांनी या परिसराची पाहणी करुन सीलडाऊनची सूचना दिली आहे. या बाधित परिचारिकेला सामान्य वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. बिम्स कर्मचाऱयांनी या प्रकाराला आक्षेप घेतला आहे.
उपलब्ध माहितीनुसार एका कोरोनाबाधितावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्या महिला परिचारिकेने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले होते. 28 जून रोजी कोविड वॉर्डमधील आपली सेवा संपवून ती घरी गेली होती. मात्र तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याचा बेळगावातील हा पहिलाच प्रकार आहे.