प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड काळात डोळय़ांची काळजी प्रामुख्याने घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी आणि डोळय़ातील ब्लॅक फंगस म्हणजे काय? आणि उपाय काय? याबद्दल माहिती देणारा हा लेख…..
डोळे हा सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. ही सर्व सृष्टी आपण आपल्या डोळय़ांनी पाहतो. मात्र या महत्त्वाच्या अवयवाची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. कोरोना काळात डोळय़ांचे विकारही उद्भवू शकतात. डोळे लाल होणे, चिकटणे, कोरडे पडणे, अशी अनेक लक्षणे आढळू शकतात.
डोळे लाल होणे म्हणजे कोविड का?

आपले डोळे लाल झाले की आपण म्हणतो डोळे आलेत. साधारणतः उष्ण तापमानात डोळे येतात. त्यामुळे ते कोणतेही दुसरे व्हायरल इन्फेक्शन असू शकते. कोविड रुग्णांमध्ये या दुसऱया लाटेत फक्त डोळे येण्याची शक्मयता असते. बाकीची ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असतीलच असे नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान येथे नेत्रतज्ञ डॉ. ली वेफलियांग यांच्या निरीक्षणानुसार डोळे आल्यानंतर ताप आणि फुफ्फुसाचे दुखणे सुरू होते. म्हणून प्रत्येकांनी डोळे येण्याबद्दल सावध राहिले पाहिजे.
अंधूक दिसणे, दृष्टीहीनता म्हणजे कोविड का?
आपल्याला ठाऊक आहे की कोविडमुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. डोळय़ांच्या मागील पडद्याला (रेटिना) जाणाऱया रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन अंधूक दिसू लागते. रेटिनाला नीट रक्त पुरवठा न होणे हा कोविडमुळे रेटिनावर होणारा परिणाम होय. मात्र वेळेवर उपचार झाल्यास दृष्टी परत येऊ शकते. अंधूक दिसणे कमी होते.
कोविड 19 ची महामारी येण्यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अडथळे दिसून येत होते. त्याचे कारण ब्लड प्रेशर किंवा वयामुळे झालेल्या रक्तवाहिन्यांच्या परिणामामुळे होत असे. मात्र महामारीच्या काळात हे प्रमाण वाढलेले आहे.
डोळय़ातील ब्लॅक फंगस?
ब्लॅक फंगस हा आजार नवीन नाही. हा संसर्गजन्य नाही यावर उपचारसुद्धा आहे. हे फंगस आपल्या आजूबाजूला असते. परंतु जेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा त्याचा त्रास होऊ शकतो. वास्तविक कोविड झाल्यानंतर बहुतेक रुग्णांना ब्लॅक फंगसचा त्रास होऊ शकत नाही. परंतु या महामारीत त्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. कोविड झाल्यानंतर दोन-तीन आठवडय़ांनी याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याची सुरुवात नाकातून होते, तेथून फंगस नाकातील सायनसमध्ये येते आणि तेथून डोळय़ांपर्यंत पोहोचू शकते.
सायनस डोळय़ांच्या अत्यंत जवळ असतात. डोळय़ातून मेंदूपर्यंतसुद्धा पोहोचू शकते. हे सगळे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत होते. मात्र तत्पूर्वी निदान झाले आणि उपचार झाले तर हा प्रश्न गंभीर न बनता डोळा व मेंदू यावर परिणाम होण्याची शक्मयता कमी होते. कोविडमधून बाहेर येताच इएनटी तज्ञ व नेत्रतज्ञ यांना नियमितपणे दाखवून सल्ला घ्यावा.