ऑनलाईन टीम / मुंबई :
सीरमची कोविशिल्ड लस मुंबईत दाखल झाली आहे. पहाटे साडेपाच वाजता लसीचा पहिला साठा मुंबईत पोहोचला आहे. मुंबई महापालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्यातून मुंबईत आणण्यात आली.

मुंबईला पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटकडून 1 लाख 39 हजार 500 लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईत कोविशिल्ड लस दाखल झाल्यानंतर आता 9 रुग्णालयातील केंद्रांवर त्यांच वितरण होणार आहे. मुंबईतील केईएम, सायन, नायर, व्हीएन. देसाई, भावा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर याठिकाणी लसीकरण होणार आहे.
दरम्यान, मुंबई एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लसीचा साठा घेऊन येणाऱ्या वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात लस ठेवण्यात आली आहे. दोन वॉक इन कुलर्स, रेफ्रिजरेटर यामध्ये लस ठेवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचं सर्वात कार्यक्षम कोल्ड स्टोरेज असलेल्या परळ विभागाची क्षमता एकावेळी 10 लाख लस साठवण्याची आहे. साधरणत: इथे पोलिओच्या लसी ठेवल्या जातात.
मुंबईला पहिल्या टप्यात 1 लाख 39 हजार 500 लस मिळाल्या असून येत्या शनिवारपासून कोविड ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.