जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱयाचे वक्तव्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 24 तासांमध्ये भारताच्या स्वदेशनिर्मित कोव्हॅक्सिन या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची (हू) आपत्कालीन उपयोगासाठी मान्यता मिळू शकते, अशी माहिती या संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी दिली आहे. ही मान्यता मिळाल्यास या लसीच्या दोन मात्रा (डोस) घेतलेल्यांना परदेश प्रवास करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच या लसीची निर्यातही करता येणार आहे.
जर सर्व काही व्यवस्थित झाले, या लसीचे सर्व अहवाल मान्य झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीचे समाधान झाले तर येत्या 24 तासांमध्ये भारताच्या लसीला मान्यता मिळू शकते, असे हॅरिस यांनी जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ या लसीला आता मान्यता मिळणार आहे, असा काढला जात आहे.
काही वेळा वेळ लागतो
कोणत्याही लसीची पूर्ण चौकशी आणि चाचणी करुनच तिच्या उपयोगासाठी मान्यता दिली जाते. यासाठी काहीवेळा जास्त वेळ लागू शकतो. तथापि, लसीची कार्यक्षमता, प्रभाव आणि सुरक्षितता योग्य रितीने आणि सखोल पद्धतीने सुनिश्चित करुनच तिच्या उपयोगाला मान्यता दिली जाते, असे वक्तव्य गेल्या शनिवारी संघटनेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱयांना पत्रकारांशी बोलताना केले होते.
हैदराबादच्या कंपनीची निर्मिती
कोव्हॅक्सिन ही पूर्णतः स्वदेशी लस असून ती हैदराबादच्या भारत बायोटेक या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने निर्माण केली आहे. एप्रिल 2019 मध्येच या लसीची नोंदणी करण्यात आली असून ती मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने अधिक माहिती मागविल्याने या लसीची मान्यता लांबली आहे. मात्र, आता ती मिळण्याची वेळ जवळ आली आहे. ही लस भारतातील कोटय़वधी लोकांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. या लसीला मान्यता जागतिक मान्यता अद्याप नसल्याने ती घेतलेल्यांना विदेशी जाणे अशक्य झाले आहे.