दीपक भोसले/ संगमेश्वर
गेली पंधरा वर्षे तो आपल्या आईच्या शोधात होता. अनेक शहरात फिरुन त्याने आईचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर तामिळनाडू येथील एका सज्जन माणसामुळे दुरावलेल्या माय-लेकरांची भेट झाली… संगमेश्वरजवळच्या कोसुंब येथील अभिषेक जाधव केवळ 5 वर्षाचा असताना आईला पारखा झाला होता… आईचा चेहराही धड आठवत नव्हता अशा स्थितीत 15 वर्षानंतर झालेल्या या भेटीने शब्दात न सामावणाऱया आनंदाची त्याला अनुभूती आली..
कोसुंब गावचे माजी सरपंच रवींद्र जाधव यांची पत्नी रंजना रवींद्र जाधव या पंधरा वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. जाधव कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पोलिसांनीही आपल्या पध्दतीने त्यांना शोधण्याचे काम केले. परंतु त्याला यश येत नव्हते. या घटनेला 15 वर्षांचा कालावधी झाल्याने एका बाजूला शोध सुरु असतानाच त्या सापडण्याची आशा मावळत चालली होती. परंतु नियती अनेकदा चांगले क्षणही लिहून ठेवते त्याप्रमाणे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तब्बल 15 वर्षानंतर बेपत्ता रंजना यांचा ठावठिकाणा सापडला व त्यानंतर अल्पावधीतच या माय-लेकरांची भेटही झाली.
15 वर्षांपूर्वी रंजना जाधव अस्थिर मानसिक स्थितीमध्ये आपल्या घरून निघाल्या. रेल्वेस्थानकावर पोहचल्यावर येऊन समोर दिसलेल्या रेल्वेत बसल्या. या रेल्वेतून त्या थेट तामिळनाडूला पोहोचल्या. वेगळी भाषा, संस्कृती व राहणीमान असलेल्या तामिळनाडूमध्ये गेली अनेक वर्षे त्यांची भटकंती सुरुच होती. कोणीतरी त्यांना तामिळनाडू येथील वेल्लोर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यावेळी येथील एका सज्जन माणसाने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रंजना यांनी त्या संगमेश्वर तालुक्यातील असल्याची माहिती दिली.
सोशल मिडीयाचा आधार
रंजना यांचा पत्ता समजल्यावर त्या सज्जन गृहस्थाने फेसबुक आणि इतर सोशल मिडियाचा आधार घेत जाधव कुटुंबियांचा शोध सुरु केला. काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर जाधव कुटुंबाशी संपर्क साधण्यात ते यशस्वीही झाले. सुदैवाने त्यांचा संपर्क झाला तोही तिच्या पोटचा गोळा अभिषेकशीच…! पहिल्यांदा यावर विश्वासच न बसलेल्या अभिषेकने त्यानंतर कुटुंबिय, मित्र व व आप्तेष्टांच्या मदतीने पुढील हालचाली वेगाने करत आपल्या माऊलीला परत मिळवले.
शुक्रवारी पोहचल्या घरी
अभिषेकला आपल्या आईविषयी माहिती मिळताच त्याने दिनेश व शरद जाधव यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने रंजना यांना कोसुंब येथे आणण्यासाठी लागणाऱया शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली. तामिळनाडू ते कोसुंब असा प्रवास करीत शुक्रवारी त्या आपल्या कोसुंब येथील घरी पोहोचल्या.
भावनांचा पूर
15 वर्षांपूर्वी मागे सोडलेला जीवाभावाचा परिसर, संसार, अवघ्या 5 वर्षाचा असताना दुरावलेला व आता उमदा तरुण म्हणून समोर आलेला काळजाचा तुकडा अभिषेक, सोबत अनेक ओळखीचे चेहरे पाहून रंजना यांना भावना अनावर झाल्या होत्या. एक-दोन नव्हे तर तब्बल पंधरा वर्षे जिच्या प्रेमवर्षावाला आपण पोरके झालो त्या जन्मदात्रीला प्रत्यक्ष समोर पाहताना अभिषेकही पुरता हेलावून गेला होता. तेथे उपस्थितांची स्थितीही काहीशी अशीच होती.
15 वर्षाचा विरह अन् सुवर्ण भेट
रंजना बेपत्ता झाली तेव्हा अभिषेक केवळ 5 वर्षाचा होता. त्याला एक बग्नहीणही आहे. वडिलांचा मृत्यू व आई बेपत्ता झाल्यामुळे अ†िभषेकची सर्व जबाबदारी त्याच्या मामाने आणि गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली. अभिषेकने मामाकडे राहत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करुन पुणे येथे नोकरी स्वीकारली. जीवनात स्थिर होत असतानाच अपरिहार्यपणे जाणवणारी ‘आई’ची कमतरताही 15 वर्षांनंतर झालेल्या या सुवर्ण भेटीने संपली आहे.