वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीने भारताचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू एम. के. कौशिक आणि रविंदर पाल सिंग यांचे बळी घेतले. 1980 साली ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीचे सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय संघामध्ये त्यांचा समावेश होता. कौशिक आणि रविंदर पाल सिंग यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आल्याची माहिती क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी दिली आहे.
भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱया एम. के. कौशिक आणि रविंदर पाल सिंग यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे आदरांजली वाहण्यात आली. लखनौमध्ये 60 वर्षीय रविंदर पाल सिंग यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सुमारे दोन आठवडे त्यांनी कोरोनाशी झुंज दिली होती. 66 वर्षीय एम. के. कौशिक यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांना कौशिक यांनी काही काळ बहुमोल मार्गदर्शन केले होते. 1998 साली कौशिक यांचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. 2002 साली त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला होता. रविंदर पाल सिंग यांनी 1980 च्या मॉस्को आणि 1984 लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. कराचीमध्ये 1980 आणि 1983 साली चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.