वृत्तसंस्था/ ऑकलंड
येत्या उन्हाळी क्रिकेट मोसमामध्ये विंडीज आणि पाक संघाविरुद्धच्या मालिका भरवण्यास न्यूझीलंड शासनाकडून क्रिकेट न्यूझीलंडला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. सदर माहिती क्रिकेट न्यूझीलंडचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
कोरोना समस्येमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रिकेट स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. पण इंग्लंडमध्ये अलीकडेच विंडीज तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका यशस्वीपणे भरविल्या गेल्या. कोरोना संदर्भातील सर्व प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करत या मालिका झाल्याचे पहावयास मिळाले. आता क्रिकेट न्यूझीलंड येत्या उन्हाळी मोसमात विंडीज आणि पाक विरुद्धच्या मालिकांचे यजमानपद भूषवणार आहे. या दोन्ही संघांच्या न्यूझीलंड दौऱयाचा कार्यक्रम पुढील आठवडय़ाच्या प्रारंभी अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले.
विंडीज आणि पाकबरोबर न्यूझीलंडचा संघ कसोटी आणि टी-20 मालिका खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱयांचे यजमानपद भूषविण्यास न्यूझीलंड शासनाने क्रिकेट न्यूझीलंडला अधिकृत परवानगी दिली असल्याने आता न्यूझीलंडच्या क्रिकेट संघटनेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. गेल्या मार्चपासून न्यूझीलंडमधील सर्व क्रिकेट हालचाली पूर्णपणे थंडावल्या आहेत. सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचे केन विल्यम्सन, बोल्ट, फर्ग्युसन, नीशम हे सहभागी झाले आहेत. आयपीएल स्पर्धा 10 नोव्हेंबरला संपणार असून जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा फटका न्यूझीलंड देशाला कमी प्रमाणात बसल्याचे सांगण्यात आले. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणावा तसा झालेला नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या नगण्य असल्याचे सांगण्यात आले.