क्रिप्टोकरेन्सीची बाजारपेठ वाढत चालली असून जगभरात यासंबंधी कुठल्या न कुठल्या प्रकारे चर्चा होत असते. पण तुम्ही कधी ऑटो रिक्षाचालकाला क्रिप्टोरकरेन्सीत भाडे स्वीकारताना पाहिले आहे का? ही तुम्हाला थट्टा वाटत असेल, कारण अनेक रिक्षाचालक पेटीएम आणि फोनपेचा वापर करणे टाळतात, मग क्रिप्टोकरेन्सी सहजपणे स्वीकारण्याची शक्यता कमीच वाटते. पण आता काळ बदलतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका छायाचित्राने लोकांना हैराण केले आहे.
हे छायाचित्र रिक्षात बसलेल्या प्रवाशाने काढले आहे. यात रिक्षाचालकासह एक पोस्टर दिसून येते, ज्यावर ‘आम्ही क्रिप्टोकरेन्सी स्वीकारतो’ असे लिहिलेले आहे. क्रिप्टोकरेन्सी अद्याप मोठय़ा स्टोअर्समध्येही स्वीकारले जात नसताना एक रिक्षाचालक ते स्वीकारत असल्याचे पाहून निश्चितच आश्चर्य वाटेल. या छायाचित्राच्या ट्विटला आतापर्यंत 1500 हून अधिक लाइक्स आणि 100 हून अधिक रीट्विट्स मिळाले आहेत. डिजिटल चलन इनक्रिप्टेड म्हणजेच कोडेड असते, याचमुळे त्यांना क्रिप्टोकरेन्सी देखील म्हटले जाते.
जपानसह काही देशांमध्ये क्रिप्टोकरेन्सीचा वापर वाढला आहे. पण भारतात क्रिप्टोकरेन्सीचा वापर अद्याप म्हणावा तितका झालेला नाही. तसेही सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून क्रिप्टोकरेन्सीला अद्याप मान्यता दिलेली नाही. पण भविष्यात चलनाचा हा प्रकार तेजीत असणार हे सांगण्यास भविष्यवेत्त्याची गरज भासत नाही.