दोनवेळा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने निर्णय : मुक्तता झालेल्यात कुडची, हिरेबागेवाडी व बेळगुंदीतील रुग्णांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाग्रस्त हिरेबागेवाडी, कुडची, बेळगुंदी येथील 121 जणांची रविवारी चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमधून सुटका करण्यात आली. यामध्ये महिला, वृद्ध व लहान मुलांचाही समावेश आहे. दोन वेळा स्वॅब चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना घरी पाठविले आहे.
हिरेबागेवाडी (ता. बेळगाव), कुडची (ता. रायबाग) ही दोन गावे तर हॉटस्पॉट बनली आहेत. या दोन गावांतून येणाऱया पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वत्र क्वारंटाईनला विरोध होत असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या तीन वेगवेगळय़ा लॉजमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवले होते.
हॉटेल पवनमध्ये 39, हॉटेल कावेरीमध्ये 11, रेक्स आयनॉक्समध्ये 29 आणि कम्फर्ट लॉजमधून 11 जणांना चौदा दिवसांपूर्वी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. हे सर्व जण कुडची, हिरेबागेवाडी व बेळगुंदी येथील राहणारे आहेत. सकाळी प्रशासनाने सरकारी वाहनातून त्यांना त्यांच्या गावी पाठविले. हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱया तीन गावांतील 121 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आणखी किमान 14 दिवस घरीच रहा
क्वारंटाईनमधून घरी पाठवताना अधिकाऱयांनी त्यांना आरोग्यविषयक सल्ला दिला. आणखी किमान 14 दिवस घरीच रहा, बाहेर फिरणे टाळा, मास्कचा वापर सक्तीने करा, तुमच्या आरोग्यात चढउतार झाले तर तातडीने प्रशासनाला माहिती द्या, असा सल्ला देण्यात आला.
बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एस. आर. डुमगोळ, मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी आदी क्वारंटाईनमधील लोकांवर लक्ष ठेवून होते. त्यांना घरी पाठविताना मिठाई देऊन निरोप देण्यात आला. यामधील प्रत्येकाला घर गाठण्याची घाई होती. त्यामुळे लॉजमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला ठरवून दिलेल्या वाहनाच्या दिशेने जाण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती.
हिरेबागेवाडीत आरोग्य विभागाची मोहीम
दरम्यान, शहरातील वेगवेगळय़ा लॉजमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या संशयितांचे स्वॅब रविवारी जमविण्यात आले आहेत. स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांनाही घरी पाठविण्यात येणार आहे. एका हिरेबागेवाडीतील 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याने रविवारीही याच गावात आरोग्य विभागाने मोहीम राबवून स्वॅब जमविल्याची माहिती मिळाली आहे.
हिरेबागेवाडी येथील दांपत्य कोरोनामुक्त
बेळगाव : हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच याच गावातील एक दाम्पत्य कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागातून त्यांना घरी जाऊ देण्यात आले. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवून त्यांना निरोप दिला. जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 54 वर पोहोचली आहे. यापैकी हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. हिरेबागेवाडी, कुडची, बेळगुंदी, कॅम्प येथील सहा जणांना आतापर्यंत घरी पाठविण्यात आल्याची माहिती बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी दिली.