सपासप वार करून पत्नीचा काढला काटा : किल्ला तलावाजवळ भरदिवसा थरार

प्रतिनिधी /बेळगाव
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा भररस्त्यात सपासप वार करून भीषण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडली. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. बेळगाव शहर व परिसरात सुरू झालेली खुनांची मालिका कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हीनाकौसर मंजुरईलाही नदाफ (वय 29) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गांधीनगर येथे तिचे माहेर असून बैलहोंगल तालुक्मयातील देवलापूर येथे सासर आहे. पती मंजुरईलाही बाबुसाब नदाफ (वय 34) याने तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा खून केल्याची कबुली दिली असून माळमारुती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास किल्ला तलावाजवळ ही घटना घडली आहे. आरोपी मंजुरईलाही हा व्यवसायाने टेलर आहे. गेल्या दोन वर्षांपासून या दाम्पत्यात कौटुंबिक वाद सुरू होता. हीनाकौसरने येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी खटलाही दाखल केला होता. शुक्रवारी त्याची तारीख होती. तारीख संपवून घरी जाताना पतीने तिचा भीषण खून केला आहे.
घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. भर रस्त्यात गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या खुनामुळे एकच धावपळ उडाली. पत्नीच्या खुनानंतर कोयता हातात घेतलेला मंजुरईलाही मृतदेहाजवळच उभा होता. गर्दीतील नागरिकांना आपण पत्नीचा खून का केला? याची माहिती देत होता.
खुनानंतर मंजुरईलाहीने दिलेल्या कबुलीनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी आरोपीला ताब्यात घेतले. सायंकाळी माळमारुती पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. आपणच पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने तपास अधिकाऱयांसमोर दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 वर्षांपूर्वी गांधीनगर येथील हीनाकौसर हिचा विवाह देवलापूर (ता. बैलहोंगल) येथील मंजुरईलाही सोबत झाला. या दाम्पत्याला एक अपत्यही आहे. दोन वर्षांपूर्वी येथील कौटुंबिक न्यायालयात हीनाकौसरने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर ती बेळगावलाच राहत होती. शुक्रवारी यासंबंधीची तारीख होती. तारीख संपवून चालत ती आपल्या घरी जात होती. त्यावेळी किल्ला तलावाजवळ मंजुरईलाहीने तिला अडविले. या दाम्पत्यात वादावादी झाली. वादावादीनंतर तीक्ष्ण हत्याराने वार करून पतीने पत्नीचा खून केला.