प्रतिनिधी खानापूर
खानापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून आतापर्यंत खानापूर, लोंढा, नंदगड या मोठय़ा गावांसह जवळपास 18 गावांमध्येही कोरोनाबाधित सापडले आहेत. यामुळे तालुक्यात कोरोना व्हायरसची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रविवारचे 11 कोरोनाबाधित धरून आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 123 पर्यंत पोहचली आहे. त्यापैकी जवळपास 50 रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. तर 5 रुग्ण दगावले असून आता जवळपास 68 सक्रीय कोरोनाबाधित आहेत. रविवारी सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये नंदगड सोनार गल्लीमध्ये 4 जणांचा समावेश असून त्यामध्ये 51 वषीय महिला तर अनुक्रमे 59, 47, 29 वषीय पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांना कोरोना झाला असून त्यापैकी दोघेजण डॉक्टर असल्याचे समजते. नंदगडजवळील बेकवाड येथेही 45 वर्षीय पुरुषासह 5 वर्षीय बालकालाही कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात उघडकीस आले आहे. बिडी येथेही 21 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. या गावातील आतापर्यंत पहिलाच रुग्ण असून कुणकीकोप्प व गोल्याळीत अनुक्रमे 42 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिलेचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. शिवाय मुगळीहाळ येथेही 19 वर्षीय युवकाला कोरोना झाला आहे. खानापूर आरोग्य केंद्रात आणखी एका 45 वर्षीय महिला कर्मचाऱयाला कोरोना झाला आहे. रविवारी सापडलेल्या 11 कोरोनाबाधितांपैकी 6 पुरुष, चार महिला व एक बालक आहे.