नगरसेवक महेश आमोणकर यांच्या पुढाकारानंतर ‘सुलभ’कडून दुरुस्तीकामांचे आश्वासन
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेच्या प्रभाग 15 चे नगरसेवक महेश आमोणकर यांनी खारेबांद येथील आपल्या प्रभागातील नादुरुस्त सुलभ शौचालयाची स्वतःच्या खर्चाने दुरुस्ती करण्याचे ठरविले होते. मात्र ‘सुलभ’च्या अधिकाऱयांनी सदर काम त्यांच्याकडून केले जाणार असल्याचे सोमवारी झालेल्या पाहणीत स्पष्ट केले.
आपल्या प्रभागातील लोकांना सदर शौचालय नादुरुस्त असल्याने तसेच मलमूत्र उघडय़ावर सोडले जात असल्याने दुर्गंधी सोसावी लागत होती. मागील नगरसेवकांनी यासंदर्भात काही केले नाही. त्यामुळे रविवारी आपण सुलभ शौचालय व्यवस्थापन अधिकाऱयांशी संपर्क साधून त्यांना जमत नसल्यास स्वखर्चाने हे काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
सोमवारी सुलभचे तसेच पालिका अधिकारी, स्थानिक आमदार दिगंबर कामत व स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली. सदर जीर्ण शौचालय पाडून नवीन शौचालय उभारले जाणार असल्याची माहिती आमदार कामत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मडगावातील अन्य जीर्ण सुलभ शौचालये नव्याने उभारण्याचा प्रस्ताव असून तो त्वरित मार्गी लावला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुलभच्या अधिकाऱयांनी आश्वासन दिल्याने आपण त्यांच्यावर भरवसा ठेवला असून आणखी काही काळ कळ सोसण्याची विनंती यापासून त्रास होणाऱया प्रभागवासियांना केली आहे. अन्यथा आपण स्वखर्चाने आवश्यक कामे करून देणार असल्याचे नगरसेवक आमोणकर यांनी स्पष्ट केले.