सर्वसाधारण दर निश्चित : सरकारी केंद्रांवर मोफत : उद्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱयांनंतर आता देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही उद्या, 1 मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. सरकारी बरोबरच आता खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात लसीची किंमत किती असेल यावर हळूहळू स्थिती स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारनेही याबाबत शनिवारी कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत 250 रुपये असण्याचे संकेत दिले. या 250 रुपयांमध्ये लसीची किंमत 150 रुपये आणि सेवाशुल्क म्हणून 100 रुपये आकारले जाणार आहेत.
लसीकरण मोहिमेच्या दुसऱया टप्प्यात सोमवारपासून 10 हजार शासकीय लसीकरण केंद्रांवर लस मोफत दिली जाणार आहे. तसेच काही निवडक खासगी रुग्णालयांमध्येही लसमोहीम राबविली जाणार आहे. खासगी रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात झाल्यास लसीकरणाच्या मोहिमेला आणखी वेग येईल. गुजरात सरकारने लसीच्या डोसनुसार 250 रुपये किंमतीची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारनेही किंमत अडीचशे रुपये राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य सचिवांनीही कोरोना लसीची किंमत जास्तीत जास्त 250 रुपये असणार असल्याचे म्हटले आहे. गुजरात आणि महाराष्ट्र सरकारप्रमाणेच इतर राज्यातील खासगी रुग्णालयांमधील लसीमध्ये किंमतीची समानता असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
दुसऱया टप्प्यात ज्येष्ठांना प्राधान्य
देशभरात सर्वसामान्य जनतेसाठी कोविड लसीकरण 1 मार्च म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. आरोग्य तसेच पंटलाईन कर्मचाऱयांचे यापूर्वीच लसीकरण झाले आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना आता कोरोनाची लस देण्यात येणार आहे. याचबरोबर विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या आणि कोविडचा अधिक धोका असलेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनाही सोमवारपासून लस मिळणार आहे. लसीकरणात यावेळी शासकीय आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयांनाही सामील करण्यात येणार आहे. म्हणजेच स्वतःच्या पसंतीच्या केंद्रात लस घेण्याचा पर्याय मिळणार आहे.
नोंदणीची प्रक्रिया अन् पद्धत लसीकरणासाठी नोंदणी
लसीकरणाच्या नोंदणीसाठी तीन पद्धती असून आगाऊ स्वरुपात स्वयंनोंदणी करता येणार आहे. याचबरोबर प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करविण्याचाही पर्याय आहे. तिसऱया पर्यायात सरकार स्वतःहून लोकांशी लसीकरणासाठी संपर्क साधणार आहे.
1) आगाऊ स्वयंनोंदणी : लसीकरणास पात्र असलेले लोक को-विन ऍप डाऊनलोड करून स्वतःच नेंदणी करू शकतात. याचबरोबर आरोग्य सेतूवरही नेंदणी करता येणार आहे. को-विनचे संकेतस्थळ cowin.gov.in वरही नोंदणी करता येणार आहे.
- नोंदणीची पद्धत
- कोरोना लसीसंबंधित ऍप किंवा संकेतस्थळावर जा
- स्वतःचा मोबाईल क्रमांक द्या, एक ओटीपी मिळेल
- एसएमएसवरील ओटीपीद्वारे स्वतःचे खाते तयार करा
- नाव, वय, लिंग नमूद करा, ओळखपत्र अपलोड करा
- लसीकरण केंद्र अन् लस मिळविण्याची तारीख निवडा
- एका मोबाईल क्रमांकावरून 4 जणांची नोंदणी शक्य
2) केंद्रावरील नेंदणी : स्वयंनोंदणी करता येत नसल्यास नजीकच्या कोविड लसीकरण केंद्रात जाऊन स्वतःची नोंदणी करता येणार आहे. एक वैध ओळखपत्र आणि को-मॉर्बिडिटीचे प्रमाणपत्र (जर लागू असल्यास) सोबत नेण्यास विसरू नका.
3) फेसिलेटेड नोंदणी : ही पद्धत राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांसाठी आहे. लक्ष्यित गटासाठी लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. सर्व लक्ष्यित गटाला आरोग्य केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न आरोग्य अधिकारी करतील. याकरता आशा, एएनएम, पंचायतराज आणि महिलांच्या स्वयंसहाय्य गटांची मदत घेतली जाईल.
लसीकरणासाठी आवश्यक दस्तऐवज
कुठल्याही पद्धतीने नोंदणी केली असली तरीही लसीकरणापूर्वी संबंधिताला ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. सरकारने 12 प्रकारच्या ओळखपत्रांना लसीकरणासाठी मान्यता दिली आहे.
आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, आरोग्य विमा स्मार्टकार्ड, निवृत्तिवेतन दस्तऐवज, बँक/पोस्टाचे पासबुक, मनरेगा जॉबकार्ड, खासदार/आमदार/नामदाराचे ओळखपत्र, सरकारी कर्मचाऱयांचे सेवा ओळखपत्र, एनपीआर अंतर्गत प्राप्त स्मार्टकार्ड.