माजी नगरसेवक संघटनेच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणारे मंडळ एका खासगी कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीमध्ये भरसाठ वाढ होणार आहे. तेंव्हा खासगी कंपनीकडे हे अधिकार न देता महापालिकेने स्वतःकडेच अधिकार ठेवावेत, यासाठी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने बैठक घेण्यात आली.
रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर नागेश सातेरी होते. पाणीपुरवठा समस्येबाबत तसेच खासगी कंपनीकडे अधिकार देण्याच्या विरोधात लवकरच जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
महापालिकेचे काही विभाग खासगीकरण करून बेळगावकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न अत्यंत गंभीर आहे. कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा खासगी कंपनीकडे देवू नये, असे विचार माजी नगरसेवकांनी व्यक्त केले. माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. माजी महापौर नागेश सातेरी यांनी प्रास्ताविक करून महापालिकेचे अधिकार आणि पूर्वी ज्या घडलेल्या घटना आहेत, त्याबाबत माहिती दिली.
खासगी कंपनीकडे अधिकार दिल्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. तेंव्हा तातडीने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना भेटून तो प्रस्ताव रद्द करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला माजी आमदार रमेश कुडची, माजी नगरसेवक नेताजी जाधव, लतीफखान पठाण, राजू मुर्कीभांवी, रमेश कळसण्णावर, रमेश सोनटक्की, दीपक जमखंडी, वर्षा आजरेकर, शीला देशपांडे यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.