तालुक्यात पाच ग्रा. पं. ठरल्या लक्षवेधी
वाडा ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांनी भगवा
प्रतिनिधी / देवगड:
देवगड तालुक्यातील 23 पैकी 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये पुरळ, शिरगाव, तळवडे, वाडा, पाळेकरवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. खासदार विनायक राऊत यांनी दत्तक घेतलेल्या तळवडे गावामध्ये शिवसेनेला सत्ता राखता आली नाही. तळवडेमध्ये भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. वाडा येथील गेली अनेक वर्षे भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकविला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष रवी पाळेकर यांची पाळेकरवाडी ग्रामपंचायतदेखील भगवामय झाली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या व चर्चेची ठरलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीवर भाजपने आपली सत्ता राखली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक राजकीय पदाधिकाऱयांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेचे खासदार राऊत यांनी दत्तक घेतलेल्या तळवडे ग्रामपंचायतीमध्ये झालेला पराभव हा शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. यामुळे खासदारांच्या कार्यपद्धतीलाही विरोधकांनी या पराभवाने बोट दाखविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. वाडा ग्रामपंचायत येथे गेली अनेक वर्षे राणे समर्थक व भाजप यांची सत्ता होती. पहिल्यांदाच शिवसेनेने गाव आघाडी पॅनेल स्थापन करीत नऊपैकी पाच जागांवर सत्ता मिळवत भगवा फडकविला आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱयांवरील नाराजीचा फटका भाजपला बसला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष रवी पाळेकर यांच्या पाळेकरवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तालुकाध्यक्षांचा गावातील पराभव भाजपलाही जिव्हारी लागला आहे.