उपसभापती फर्नांडिस यांचे पाहणीच्या वेळी निर्देश
प्रतिनिधी / काणकोण
मागच्या अडीच वर्षांपासून चालू असलेल्या खोतीगाव शाळा इमारतीच्या रखडलेल्या कामाची नुकतीच काणकोणचे आमदार असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी पालकांसहित पाहणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणपती नाईक आणि कामाचे ठेकेदार देखील उपस्थित होते.
पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळामार्फत हातात घेतलेल्या मतदारसंघातील अन्य प्रकल्पांपैकी एक खोतीगाव सरकारी शाळा इमारतीचा प्रकल्प आहे. या ठिकाणच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून प्रयोगशाळा, स्टाफ रूम, स्टोअर रूम त्याचप्रमाणे वर्गखोल्या बांधायला घेतल्या होत्या. अडीच वर्षे हे काम रखडलेले असून सध्या केवळ लोखंडी सांगाडा तयार करण्यात आलेला आहे. त्यावर पत्रे टाकणे आणि अंतर्गत सुशोभिकरण बाकी आहे.
या शाळा इमारतीचे काम पूर्ण करून लवकरात लवकर इमारत वापरायला द्यावी, अशी मागणी करणारी निवेदने स्थानिक सरपंच दया गावकर, पालक-शिक्षक संघटनेचे पायक वेळीप यांनी वारंवार पाठविली आहेत. मूलभूत साधनसुविधा नसताना देखील सदर शाळा मागच्या पाच वर्षांपासून दहावीचा निकाल 100 टक्के देत आलेली आहे, अशी माहिती दया गावकर यांनी दिली. या संपूर्ण बांधकामाची पाहणी करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपसभापतींनी ठेकेदाराला दिले.