दोडामार्गातील युवकांचा सौदी अरेबिया, दुबईत गणेशोत्सव : एकत्र येत केला उत्सव साजरा : कोरोनामुळे विदेशातच केले पूजन
तेजस देसाई / दोडामार्ग:
कोरोना व्हायरसमुळे देशात येऊ न शकलेल्या सौदी अरेबियात कामानिमित्त असलेल्या दोडामार्गातील युवकांनी एकत्र येत सौदी अरेबियात गणेश उत्सव साजरा केला. प्रत्येक्षात गणेशोत्सवात गावी येणे शक्य न झाले तरी गणरायाची आस या युवकांना स्वस्थ बसू देईना. याच ओढीतून या युवकांनी एकत्र येत उत्सव साजरा केला. गणेश स्थापना, गाऱहाणे, आरती, पंगत जेवण व सायंकाळी भजन असे पारंपरिक पद्धतीने या युवकांनी गणपती पूजन केले.
गणपती बाप्पाच्या आगमनाची आस प्रत्येक गणेश भक्ताला असते. गणेश विसर्जन झाले की पुढच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीची तारीख दिनदर्शीकेमध्ये शोधली जाते व नियोजन सुरू होते. पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या किंवा देशातील विविध भागात कामानिमित्त असणारे कोकणी गणपतीला येण्याचे परफेक्ट नियोजन करतात. मात्र, नोकरीनिमित्त विदेशात असणाऱया युवकांना कोरोनामुळे गावी येता आले नाही. परिणामी छोटय़ा सणांची हुरहूर नाही लागली तरी गणपती उत्सवाची ची हुरहूर गप्प बसू देत नाही. मग, जवळच्या मित्रानीं एकत्र येत लाडक्या बाप्पांचे पूजन करण्याचे ठरविले. सौदी अरेबिया व दुबई येथे तालुक्यातील युवकांनी एकत्र येत एकत्र येत सण साजरा केला.
साध्या पद्धतीने उत्सव
यावर्षी गणपती उत्सव कसा साजरा करायचा, याबाबत शासनाच्या निर्देशानुसार साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला. आजही कोविडचे रुग्ण आढळत असून सामाजिक व आरोग्य स्वास्थ्य बिघडले आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱया चाकरमान्यांचा टक्का घसरला आहे. शिवाय ब्राम्हणांच्या पूजेने स्थापन होणारा गणपती घरातील ज्येष्ठ व्यक्तींने स्थापन केला. तर काही मुंबईकरांनी गावी येण्यापेक्षा तिथेच गणपती पूजन केले. एवढे गणेशोत्सवाचे संदर्भ बदललेले पाहायला मिळते. हे जरी खरे असले तरी काहीजण अगोदर 28/14 दिवसांचे क्वारंटाईनसाठी गावी आले व सणात सहभागी झाले. दरवर्षीप्रमाणे ते भक्तीत तल्लीन झाले आहेत. मात्र, ही देशातील भक्तांची स्थिती झाली. मात्र, विदेशात कामाला असणाऱया गणेश भक्तांना गावी येणे शक्य झाले नाही. कोकणातील मोठा सण असणाऱया बाप्पांच्या आगमनाची त्यांनाही आस असते. त्यासाठी जवळ जवळ राहायला असणाऱया मित्रांनी एकत्र येत यावर्षी गणपती उत्सव साजरा केला.
सौदी अरेबियात सण साजरा
सौदी अरेबिया या ठिकाणी सण साजरा करताना काही मित्रांनी एकत्र येण्याचे ठरविले व मूर्ती स्थापना केली. मखरामध्ये मूर्ती ठेवत तशी सजावटही केली. यामध्ये ओमकार देसाई (केर-दोडामार्ग), मनोज चोर्लेकर (तिलारी दोडामार्ग), अमोल धर्णे ( साटेली-भेडशी, दोडामार्ग) पृथ्वीराज देसाई (हेवाळे- दोडामार्ग) शशिकांत मसुरकर (केरी), ज्ञानेश नाईक (केरी), विनायक लोहार (बेळगाव), हरीश कडलसकर (बेळगाव) यांनी सण साजरा केला.
आरती, पंगत भोजन व नैवेद्यही
घरापासून लांब राहिल्यावर जेवण बनवण्याची कला ही आलीच पाहिजे. या युवकाकडे ती आहे. त्यांनी गणपतीची आरती, पंगत भोजन ते मोदकाचा नैवेद्य याचाही आनंद लुटत तन्मयतेने उत्सव साजरा केला.
दुबईतही गणेशोत्सव
सौदी अरेबिया येथे युवकांनी गणपती सण साजरा केला. त्याचबरोबर विदेशात दुबई येथे बोडदे येथील नामदेव गवस व मित्रांनी आपल्या खोलीवर गणेशोत्सव साजरा केला. यामध्ये जय भवानी ग्रुप दुबईचे कल्पेश शंखे (मुंबई), सुनील पाटील (मुंबई), छगन पाटील (मुंबई), अजय मोरे (मुंबई), करण जोशी (मुंबई), नितीन लाड (कणकवली), योगेश महांगडे (सातारा), नामदेव गवस (दोडामार्ग), उल्हास देसाई (दोडामार्ग), संदीप लाड (कणकवली), उत्तम गवस (दोडामार्ग), समीर बोटेकर (रायगड), रोहित पंडित (दोडामार्ग), विक्रांत गवस (दोडामार्ग), जितेश जाधव (कोल्हापूर) हे गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी एकत्र आले.