
वार्ताहर /उचगाव
ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा शाम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, अशा ऐतिहासिक स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा हा दिवस. कर्तृत्ववान स्त्रियांनी विविध क्षेत्रात अनमोल कामगिरी केली आहे. अशा सर्व महिलांचा सन्मान म्हणजेच जागतिक महिला दिन असल्याचे मत वडगाव येथील नगरसेविका सारिका पाटील यांनी व्यक्त केले.
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाटय़ावरील गणेश दूध संकलन केंद्र आणि गणेश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या सौजन्याने महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन आणि महिलांचा गौरव अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सारिका पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या प्रोप्रा. अरुंधती देसाई होत्या. व्यासपीठावर रुक्मिणी देसाई, प्रेमा तमुचे उपस्थित होत्या.
प्रारंभी गणेशमूर्तीचे पूजन सारिका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रतिमा पवार यांनी प्रास्ताविक भाषणात महिला दिनाचे महत्त्व व महिला दिन कार्यक्रमासंदर्भात सविस्तर माहिती दिली. मळेकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी गणेश दूध उत्पादक संघातर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाते. त्यांच्याकडून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रोत्साहनपर सहकार्य केले जाते.
शेतकऱयांसाठी विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. महिला दिनाचा उगम आणि जागतिक स्तरावर महिला दिनाचा सविस्तर वृत्तांत त्यांनी सांगितला. या दिनाचे औचित्य साधून वर्षा कांबळे, सुरेखा कांबळे, सुवर्णा कांबळे, सुरेखा बंडू कांबळे, अश्विनी कांबळे, निकिता देवरमनी यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक उमेश उर्फ प्रवीण देसाई, किरण देसाई, मॅनेजर सुधाकर करटे, यासह महिलावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. या दूध केंद्रातील सर्व कर्मचाऱयांचाही भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले. प्रेमा तमुचे यांनी आभार मानले.