न्हावेली / वार्ताहर-
लॉकडाउनमुळे सर्वच घटकांतील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार कारागिरांची कमतरता, कच्च्या मालाचा तुटवडा आदी अडचणींशी झुंज देत आहेत. एकीकडे आर्थिक अडचण तर दुसरीकडे नियमित भाविक टिकवून ठेवण्याचे आव्हान, अशा कात्रीत मूर्तिकार सापडल्याचे दिसत आहे. मूर्तींची किंमत अर्ध्यावर आल्याने व्यवसाय टिकविणे कठीण झाले असल्याचे, न्हावेली-मेस्त्रीवाडी येथील गणराज आर्ट शाळेचे मूर्तीकार प्रकाश मेस्त्री यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमा बंद झाल्याने मातीचा प्रश्न निर्माण झाला. त्यात प्रशासनाकडून मूर्तींच्या उंचीची घोषणा उशिरा झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. चार हजारांची मूर्ती थेट दोन हजारांवर आली आहे. गणराज आर्ट शाळेत सातार्डा, न्हावेली, मळेवाड, सोनुर्ली, पाक्याचीवाडी, मळगाव आदी परिसरातील भाविकांकडून मूर्तीची मागणी असते. प्रत्येक मूर्तिकाराचे दर हे त्याच्या कौशल्य, प्रसिद्धी, विभागानुसार वेगवेगळे असतात. आम्ही भाविकांची अडचण समजू शकतो. मात्र, मूर्तिकारदेखील विविध अडचणींतून जात असल्याचे सरकारने समजावे, असेही प्रकाश मेस्त्री म्हणाले.सरकारकडून एकीकडे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीबाबत आग्रह धरला जातो. मात्र मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना अपेक्षित सहकार्य केले जात नाही. मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी मार्च महिन्यापासून मूर्तिकारांची लगबग सुरू होते. सद्यस्थितीत विजेच्या लपंडावामुळे अनेस समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकंदरीत सर्व बाबींकडे सरकारने लक्ष देऊन मूर्तीकारांना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी, मूर्तीकार प्रकाश मेस्त्री यांनी केली आहे.