माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगची जोरदार टीका, पॅडी उप्टनसारख्या व्यक्तीची संघाला आवश्यकता असल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांच्या तुलनेत मला सौरभ गांगुलीकडून नेहमीच अधिक मदत, सहकार्य मिळाले, असे माजी अष्टपैलू युवराज सिंग म्हणाला. युवराजने 2000 साली ऑस्ट्रेलियात संपन्न झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्यानंतर तो राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळला.
‘मी गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलो आणि त्याचेच मला सर्वाधिक सहकार्य लाभले. त्यानंतर माही कर्णधार होता. गांगुली व माही यांच्यात कोणाची निवड करायची, हे कठीण आहे. सौरभने केलेली मदत नेहमी आठवते. पण, अशा प्रकारचे सहकार्य माही व विराटकडून मला मिळाले नाही’, असे युवराज स्पोर्टस्टारच्या मुलाखतीत म्हणाला.
अष्टपैलू युवराजने 304 वनडे खेळले असून यात 110 सामन्यात गांगुली तर 104 सामन्यात धोनी कर्णधार होता. खेळाडूंना मैदानाबाहेरील आपल्या समस्यांबाबत मोकळेपणाने बोलता येईल, अशी उत्तम व्यक्ती सध्याच्या संघाला हवी आहे, असा दावा युवराजने केला. पॅडी उप्टन ही व्यक्ती अशी होती, ज्यांच्याकडे खेळाडू आपली जीवनशैली आणि मैदानाबाहेरील बाबीबाबत बोलू शकत असत, याचा युवीने येथे उल्लेख केला. पॅडी उप्टन हे गॅरी कर्स्टन प्रशिक्षक असताना मानसिक स्वास्थ, कंडिशनिंग कोच म्हणून कार्यरत होते.
सध्याच्या लॉकडाऊनबद्दल बोलताना युवराजने काही लोकांचा कोरोना व्हायरसमुळे जीव जात असल्याचे पाहणे वेदना देणारे असल्याचे सांगितले. ‘जगभरात ज्या वेगाने हा विषाणू पसरत आहे, ते निश्चितच चिंतेचे आहे. लोकांनी गोंधळून, घाबरुन जाण्याऐवजी जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आरोग्य खात्याशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधून हा रोग कसा आहे, ते समजून घेता येईल’, असे युवराज म्हणाला.
‘मला ज्यावेळी कर्करोग झाल्याचे निदान झाले, त्यावेळी मला देखील खूप मोठा धक्का बसला होता. पण, यातून कसे बाहेर यायचे, कसे सावरायचे, त्याची मला योग्य माहिती मिळाली. मी योग्य त्या डॉक्टरांकडे आणि हॉस्पिटलकडे गेलो. सोशल मीडियामधून कोरोना व्हायरसबाबत जी माहिती येते, त्यावर कृपया विश्वास ठेवू नका. त्याऐवजी आरोग्य खात्याशी संपर्क साधा, असे कळकळीचे आवाहन त्याने शेवटी केले.