मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सोमवारनंतर सुरू करण्यात येणार : तपशील घेऊन नेंद करणार
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या मालकीच्या असंख्य मालमत्ता असून या मालमत्तांची नोंद कार्यालयात नाही. शासनाकडून कोणतीही माहिती विचारली असता सर्वेक्षण करून माहिती घ्यावी लागते. त्यामुळे महापालिकेने मालमत्तांचा तपशील घेऊन नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमण आणि गायब झालेल्या जागांची माहिती उघड होण्याची शक्मयता आहे.
शहर आणि उपनगरांत महापालिकेच्या असंख्य खुल्या जागा आहेत. मात्र याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. अनेक खुल्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या असून काही जागांच्या भाडेकराराची मुदत संपूनही महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. तसेच काही जागा हडप करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी महापालिकेने व्यापारी संकुलांची उभारणी करून गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. पण मालमत्तांची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही.
सिटी सर्व्हे कार्यालयात मनपाचे नाव दाखल करण्याकडे दुर्लक्ष
शहर व उपनगरात नवीन रस्ते निर्माण करण्यात येतात. तसेच नवीन वसाहती निर्माण करताना कायद्यानुसार खुल्या जागा, उद्यानाची जागा राखीव ठेवण्यात येते. या जागा महापालिकेकडे हस्तांतर करण्यात येतात. या जागा ताब्यात घेऊन सरकार दप्तरी महापालिकेचे नाव दाखल करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत महापालिकेने काही जागा हस्तांतर करून घेण्याकडे आणि सिटी सर्व्हे कार्यालयात मनपाचे नाव दाखल करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
प्रत्येक मालमत्तेला पीआयडी क्रमांक देणार
त्यामुळे अशा सर्व जागांची माहिती घेण्यासाठी मनपाने खुल्या जागांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. शासनाकडून कोणतीही माहिती विचारली असता मालमत्ताची नेंद महापालिकेकडे नसल्याने व्यवस्थित माहिती देता येत नाही. परिणामी मालमत्ता, खुल्या जागा, स्मशानभूमी, व्यापारी संकुल, गाळे आदी सर्वच माहिती घेण्यासाठी प्रत्येकवेळी सर्वेक्षण मोहीम राबवावी लागते.
काही मालमत्तांची नोंद नसल्याने अतिक्रमण, जागा हडप करणे असे प्रकार वाढण्याचा धोका आहे. नोंद नसल्याने काही जागांबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने मालकी हक्काच्या जागा गमवाव्या लागत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या स्मशानभूमीसह सर्वच मालमत्तांची माहिती जमा करून प्रत्येक मालमत्तेला पीआयडी क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी कागदपत्रे व इतर माहिती जमा करण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मालमत्तांची माहिती ठेवण्यासाठी इस्टेट ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे इस्टेट ऑफिसरच्या देखभालीखाली मालमत्तांची माहिती जमा करण्यात येणार आहे.