अनेक शेती पाण्याखाली जाऊन नुकसान : गिरी भागातील घरात पाणी, रस्ते पाण्याखाली,मुळ कारण शोधून काढणे गरजेचे

प्रतिनिधी /म्हापसा
गिरी म्हापसा हमरस्त्यावर आठ दिवसापूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे पाणी शेतात अडकून या ठिकाणी सर्व शेती पूर्णतः पाण्याखाली गेली. याचा फटका गिरी, नामोशी, सांगोल्डा आदी आजुबाजूच्या परिसराला बसला. याठिकाणी दरवर्षी पाणी तुडुंब भरून राहते व गिरी भागातील सरकारी शाळा व पंचायत जवळील रस्ता पाण्याखाली जातो. यंदा मात्र पाणी बरेच भरले व या भागाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बार्देश तालुक्यातील सर्व आमदार, विविध खात्याचे अधिकारी वर्गांना बोलावून या पाणी समस्याकडे तोडगा काढण्याचा इशारा दिला असला तरी यामागचे मुळ कारण काय हे शोधून काढणे अद्याप कुणालाही जमले नाही. जो तो आपली कातडी वाचविण्यासाठी आरोप प्रत्यारोप करीत असले तरी प्राशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यकाळात गिरी भागात पूर येऊन घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर कायमचा तोडगा काढणे काळाची गरज आहे.
मुख्यमंत्र्याच्या या परिसरात भेटीदरम्यान आमदार पंचायतनी एकमेकावर आरोप करण्याचे प्रयत्न केले मात्र हे पाणी भरण्यास मुख्य कारण काय आहे हे कुणालाच शोधून काढता आले नाही. सध्या या भागात हमरस्त्यावर पूल बांधताना येथे छोटे नाले ठेवण्यात आले तसेच रस्त्याच्या बाजूला मातीचे भराव टाकल्याने पाण्याला सुरळीत जाण्यास वाट मिळाली नाही त्यामुळे या भागात यंदा मोठय़ा प्रमाणात पाणी अडकून राहिल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला.
यंदा पावसाचे प्रमाणही तसे मोठे होते. सलग पाच दिवस लागलेल्या मुसळधार पावसामुळे याभागात नदीचे स्वरूप प्राप्त झाले. यामागचे कारण म्हणजे सांगोल्डा, गिरी परिसरातील पाणी खाली येऊन गिरीच्या बाजूनी नाल्यातून बाहेर जाते. मात्र काही नाले मातीच्या भरावामुळे भरल्याने व गिरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे येथे पाणी तुडुंब भरून राहिल्याचे नागरिकांचे मत आहे.
सांगोल्डा भागही पाण्याखाली
सांगोल्डा, गिरी भागातील सर्व पाणी गिरी ग्रीनपार्क हमरस्त्याजवळ येऊन तेथून नाल्यातून खाली शेतात जाऊन नंतर ते म्हापसा तार नदीच्या पात्रात जाते. पण सध्या तार नदीतच गाळ उसपला न गेल्याने तार नदी भरून इतरत्र वाहत आहे. यावर गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. या पाण्यामुळे बस्तोडा, तार नदी परिसर आदी ठिकाणच्या घराना याचा फटका बसत असून ही समस्या बस्तोडा पंचायत, गिरी पंचायत, सांगोल्डा पंचायतीनी एकत्रित येऊन सोडविणे काळाची गरज आहे. हा प्रकार नेमका का निर्माण झाला याकडे सर्वांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
गाळ, नाले, उसपणे गरजेचे
परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रशासनासमवेत याठिकाणी भेट देऊन पाहणी केली व यामागचे मुख्य कारण थोडय़ाफार प्रमाणात मधोमध टाकण्यात आलेले मातीचे भराव तसेच तार नदीचा गाळ न उसपल्याने या भागात पाणी अडकून राहिल्याचे स्पष्ट करीत तार नदीचा गाळ थोडा थोडा न उसपता पावसानंतर तार नदीत पूर्णतः असपण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. व उपस्थित अधिकारी वर्गांना दोन दिवसात पाणी का भरले व पाण्याचा निचरा कसा होईल याकडे तातडीने लक्ष देण्याचा आदेश दिला. सध्या दोन दिवस वरून राजाने थोडय़ाफार प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी प्रशासनीने येथील पाणी जाण्यासाठी तशी पाऊले अद्यापतरी उचलली नाही. हे येथे फेरफटका मारता आढळून आले आहे. गिरी भागात रस्त्यावर अद्याप पाणी तुंबलेले आहे. शेतीमध्ये पाणी आहे. सांगोल्डा भागातही तीच परिस्थिती आहे. पाण्याखाली गेलेली शेती थोडय़ाफार प्रमाणात पाणी जाऊन वर आली असली तरी वरुण राजाने आपला जोर कायम धरण्यास सुरुवात केल्यास जैसे थे परिस्थिती होण्यास उशीर लागणार नाही त्यामुळे याकडे कायमस्वरुपी तोडगा काढणे काळाची गरज आहे.
नाले, गटारे असपणे सुरू होईल तेव्हाच ही पाण्याची समस्या सुटेल- पंच सनी नानोडकर

गिरी पंचायतीचे पंच सदस्य सनी नानोडकर या पाणी समस्येबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, येथे पाणी पूर्वीपासून भरते. आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा त्या नदीमध्ये मासे काढत होतो. 35 वर्षे झाले एक कोणी याकडे लक्ष घातले नाही. सर्व काही दुर्लक्ष झालेले आहे. झाडेपेडे याठिकाणी शेतात पडलेली आहे. सर्वत्र ब्लॉकेज झालेले आहे. जोपर्यंत हे उसपत नाही तोपर्यंत सांगोल्डा, गिरी, सुकूर, बस्तोडा भागात पाणी कायमस्वरुपी भरून राहणार आहे. आपल्यामते हा सर्व भाग असपणे आज काळाची गरज आहे. सरकारने वा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जलसंचयन खाते वा अन्य खात्याना बोलावून याचा टेंडर त्वरित काढून हा भाग पूर्णतः असपण्याची गरज आहे. तेव्हाच खऱया अर्थाने या भागाला न्याय मिळेल. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत काहीच उपाय होणार नाही. रस्ते पूल आम्हाला नको तरी भावी पिढीला हवी आहे. आणि ती काळाची गरजही आहे. विकासाबाबत आपले मत आहे की जो विकास 10 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता तो आता झाला आहे. मात्र याबरोबरीने त्याचवेळी सर्व गटार व नाले उसपणे झाले असते तर अधिक बरे झाले असते. अशी माहिती पंच श्री. नानोडकर यांनी दिली.
शेतातील कान ला पाईप न घातल्याने सांगोल्डात पुरस्थिती- अविनाश नाईक

सांगोल्डाचे माजी सरपंच तथा पंच सदस्य अविनाश नाईक आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सांगोल्डा भागात आज जे पाणी भरले आहे त्याला हमरस्त्यावरील अधिकारी वर्ग जबाबदार आहेत. त्यांनी योग्यरीत्या या भागाचे सर्वेक्षण केले नसल्याने आज या भागाला पुरस्थिती आलेली आहे. पूर्वी शेतात चार पाच ठिकाणी कान ठेवत होते जेणेकरून पाणी या भागातून त्या भागात जात असे मात्र हमरस्ता प्राधिकारमाने रस्ता बांधत असताना योग्यरीत्या सर्वेक्षण न केल्याने सांगोल्डा भागात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज सांगोल्डा, साईबाबा मंदिर जवळ सर्व शेती पाण्याखाली गेली आहे. पाण्याला वाट नसल्याने पाणी साठून राहिले आहे. यातील काही पाणी जिरणार बाकी पाण्याचे काय. आता हायवे पुलामुळे पाण्याची उंचीही वाढलेली आहे. त्यात सुकूर, सांगोल्डा, पर्वरी येथील पाणी या भागात येते आणि पाणी दुसऱया बाजूनी वळत नाही. जे पोर्तुगीज कालीन शेताच्या बाजूला कान आहेत त्याची पुन्हा सर्वेक्षण करून तेथे पाईपलाईन घेलणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कालवाही घालणे आवश्यक आहे. तेव्हाच हा पाणी साठून राहण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी माहिती श्री. नाईक यांनी दिली.
तार नदी ड्रेजरने खोदणे गरजेचे- आमदार जयेश साळगावकर

गिरी हा सखल भाग आहे. चारही बाजूने याठिकाणी पाणी येते आणि तेथे अडकून राहते व त्यानंतर तार नदीच्या पात्रात जाते. प्रथम त्याठिकाणी सुकतीवर एक बांबू आतमध्ये जात नव्हता. आता तेथे माणूस उभा राहू शकतो. इतका गाळ असपण्याची तेथे गरज आहे. तार नदी असपली गेली नाही, इतर नद्या उसपल्या गेल्या. याबाबत आपण विधानसभेतही आवाज उठविला होता. सर्व घाण, म्हापशाचा कचरा, प्लास्टिक येथे सोडलेले आहेत. या नदीचे सर्व कान बंद झाले आहेत, पाणी हळूहळू वरच्यावर जाते. हायटाईड जेव्हा येतात तेव्हा पाणी उलट येते. त्यामुळे येथे पाणी थांबते. हे फक्त गिरीतच नव्हे तर हळदोणच्या बाजूला, मयडे, उसकई बस्तोडा भागातही पाणी भरून राहते. शेती बुडून राहतात. गिरी सांगोल्डा भागातील पाणी तरी कमी होते मात्र त्याभागाचे पाणी तसेच अडकून राहते. याला मुख्य कारण आहे तार नदी उसपणे. अशी माहिती आमदार जयेश साळगावकर यांनी दिली.
पॅप्टन ऑफ पोर्टचे ड्रेजर येथे येऊ शकत नाही. ते काम जलसंचन खात्याने करायला पाहिजे अन्यथा आता अत्याधुनिक सकशन पद्धत आली आहे. तो फ्लोड ओढून घेतो व तेथून बाहेर टाकला जातो. तो भागाचा गाळ काढून शतात बाहेर फोकतो. 3 मीटर साफ करतो अशा पद्धतीने तीन तीन मीटरने ती नदी साफ करता येते. अन्यथा मधोमध माती घालून जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढता येतो व माती काढत जेसीबी पाठिमागे घेता येते. तसेच येथील छोटे मोठे नालेही साफ होणे गरजेचे आहे. हे पावसाळय़ापूर्वी साफ होणे गरजेचे आहे. जो लोड माती पावसात येते ती साफ होणे गरजेचे आहे. याला प्रिन्सिपल वा मेंटेन्स ड्रेगींग येथे होणे काळाची गरज असल्याचे मत आमदार जयेश साळगावकर यांनी व्यक्त केले.
कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यास सोय केली नाही- किशोर राव

यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रीयवादी समाज पक्षाचे अध्यक्ष दोन बिल्डींगसाठी गिरीत जो मातीचा भराव टाकला आणि डाव्या बाजूला एनबी राव या कंत्राटदाराने माती भराव केला ती बुझली म्हणून गिरी भागात पाणी अडकून राहिले. रस्ते बनविले त्या बाजूला पाणी जाण्याची सोय केली नाही त्यामुळे पाणी अडकून गिरी पंचायत पाण्यात गेली. तो परिसर पूर्वीच खालच्या पातळीवर आहे. अशावेळी एकच उपाय म्हणजे सरकारने मोठे उच्च दाबाचे पंप घालून येथील पाणी खाली करावे. अन्यथा आम्ही आणून देतो. सर्व खात्यातील जलसंचयन, पीडब्यूडी खाते झोपा काढतात व फुकटचा पगार खातात. असा आरोप त्यांनी केला. याला कंत्राटदार एम.बी. रावच जबाबदार आहे असेही ते म्हणाले.
बुझलेले साकव खुले करा- प्रवीण आसोलकर

म्हापसा युथचे अध्यक्ष प्रवीण आसोलकर म्हणाले की, पूर्वी आम्ही शेतात कान ठेवत होते ते याभागात संपूर्ण बुझविण्यात आवे आहेत. गिरीत जो ग्रीनपार्क जवळ पाणी जाण्यास वाट करण्यात आली ती एकदम छोटी आहे. त्याच्या बाजूला मातीचे भराव टाकल्याने ते भराव तसेच आहे. त्यात पाणी अडकून आहे. दुसऱया बाजूने छोटे साकव आहेत ते माती भरून बुझले आहे. त्यामुळे पाण्याला जाम्यासाठी वाट नाही. तार नदीच्या पात्रात जी घाण साचली आहे ती इतरत्र मरड नाल्यातून वळवावी वा आकय भागात न्यावी. शिवाय तार नदी खोदणेही काळाची गरज असल्याचे आसोलकर म्हणाले.