वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) स्वतःच्या हवामान विषयक बुलेटिनमध्ये पहिल्यांदा पाकव्याप्त काश्मीरच्या भागांचा समावेश केला आहे. हवामान विभागाने गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादसाठी हवामानाचा अनुमान वर्तविण्यास प्रारंभ केल्याची माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी गुरुवारी दिली आहे.
आयएमडीचे हे पाऊल पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असल्याच्या भूमिकेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये चालू आठवडय़ात निवडणुकीची घोषणा केली असल्याने भारताने आता आक्रमक भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे.
आयएमडी पूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी हवामानाचा अंदाज वर्तवित असते. परंतु आता गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादसाठी देखील हवामानाचा अंदाज वर्तविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. हे भाग भारताचेच हिस्से असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयएमडी दीर्घकाळापासून पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळसाठी हवामानाचा अंदाज वर्तवित आला आहे. मागील दोन दिवसांपासून आम्ही ही माहिती स्वतःच्या प्रादेशिक बुलेटिनमध्ये देण्यास प्रारंभ केल्याचे मोहपात्रा म्हणाले.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केल्यापासून जम्मू-काश्मीर तसेच लडाखसाठी हवामानसंबंधी स्वतंत्र अंदाज वर्तविले जात आहेत.
पीओके उत्तर-पश्चिम विभागात
पाकव्याप्त काश्मीरमधील ही शहरे आयएमडीच्या उत्तर-पश्चिम विभागाच्या अंतर्गत येतात. आयएमडीच्या उत्तर-पश्चिम विभागात 9 उपविभाग आहेत. यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली-चंदीगड-हरियाणा, पंजाब, पूर्व उत्तरप्रदेश, पश्चिम उत्तरप्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान सामील आहे.