गुंजी वार्ताहर
सर्वत्र कोरोनाने दहशत माजविली असुन अनेक ठिकाणी गावागावात संपूर्ण लॉक डाऊन करून गावात येणारे जाणारे रस्ते बंद केले आहेत. मात्र गुंजी गावाने असा निर्णय अद्याप घेतला नव्हता. गाव सीलडाउन करायचे की नाही या विवंचनेत अनेक नागरिक असतानाच येथील नागरिकांनी स्वयंघोषित सीलडाऊन करून संपूर्ण रस्ते बंद केले. सध्या गुंजीसह परिसरातील खेडय़ापाडय़ात कोरोनाने दहशत माजवली असली तरी गाव पातळीवर संपूर्ण गुंजीगाव सीलडाउन करायचे का नाही हा अध्याप निर्णय झाला नसला तरी ग्रामपंचायतीने सोशल मीडियावर घातलेल्या एका ध्वनिफीतीत गुंजीत संपूर्ण सीलडाऊन करण्यात आल्याचे म्हटले असून त्यात अनेक नियमांचा उल्लेख करून त्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. हाच धागा पकडून ध्वनिफीतीतील अवाहनावरुन गावातील गल्लोगल्लीच्या नागरिकानी गुंजीमध्ये येणारे सर्व रस्ते त्याच बरोबर गल्लीमधीलही रस्ते बांबुच्या काटय़ा लावून बंद करून गुंजीगाव संपूर्ण सील डाउन झाल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता परगावातील नागरिकांना गावात येण्यावर निर्बंध लादण्यात आला असून गल्लीचे नागरिक यावर नजर ठेवणार असल्याचे समजते.
गुंजीगाव सीलडाऊन केल्यामुळे गुंजी गावाच्या परिसरातील गावांच्या नागरिकांना याचा बराच फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. कारण गुंजीगावामध्ये डॉक्टर, मेडिकल, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेरी, बँक, सोसायटी याच्याशी लोकांचा दररोजचा संबंध असून या सर्व सेवेपासून या लोकांना दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे त्या लोकांच्या समस्यांमध्ये मोठी भर पडणार आहे. सील डाऊन किती दिवस राहणार हे सध्या घोषित केलेले नसले तरी या कार्यकर्त्यांना मिळणारे गावकऱयांचे सहकार्य व पाठबळ यावरच ते अवलंबून असून ग्रामपंचायतीची यामध्ये भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.