वृत्तसंस्था/ अहमदाबाद
संपूर्ण जगभारात थैमान घालणाऱया कोरोना महामारीने गुजरातमध्येही दाणादाण उडवली आहे. राज्यात पावणे दोनशेपेक्षा अधिक महिला आपल्या नवजात बालकाला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी कोरोनाने देशभरात प्रवेश करण्यापूर्वीच गर्भवती महिलांना कोरोनाची चाचणी अनिवार्य केली होती. राज्यात आतापर्यंत 171 गर्भवतींना कोरोनाचे संक्रमण झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोनाचे संक्रमण झालेल्या गर्भवती महिलांपैकी 54 महिलांची सुखरुपपणे प्रसूती झाली आहे. तर दोन गर्भवतींचा प्रसूतीदरम्यानच मृत्यू झाला. गर्भवती महिलांमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण पाहता राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यानुसार कंटेनमेंट झोनमधील गर्भवती महिलांच्या प्रसूतीपूर्वी 5 दिवस त्यांना कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य आहे. आरोग्य प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन गर्भवती महिलांच्या स्वॅबची तपासणी केली जात आहे.
राज्यात कोरोनाने हाहाकार
गुजरातमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 12,910 झाली असून, या रोगामुळे आतापर्यंत राज्यात 773 लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त अहमदाबादमध्ये 9449 रुग्ण असल्याचे समोर आले असून, 619 लोकांचा मृत्यू झाला आहे. सूरतमध्ये 1227 लोक संक्रमित असून, वडोदरामध्ये रुग्णसंख्या 750 वर पोहोचली आहे.
राजस्थानमध्ये रुग्णसंख्या
6,015 वर
देशभरात लॉकडाऊन-4 लागू करण्यात आल्यानंतर हरियाणाहून राज्यस्थानात जाणाऱया लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यस्थान सरकारने हरियाणा रोडवेजच्या बसेसना राज्यस्थानमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे. यानुसार दोन मुख्य रस्त्यावर बसेस धावणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. राजस्थानमध्ये 170 नवीन रुग्ण असल्याचे समोर आले आहे. राज्यामध्ये एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 6,015 वर पोहोचली आहे.
राजधानी दिल्लीत रोज नवे संकट
दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाचे नवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. राज्यात एकाच दिवसात शुक्रवारी सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या समोर आली आहे. मागील 24 तासात राज्यात 660 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. यानंतर एकूण रुग्णसंख्या वाढून 12,319वर पोहोचली आहे. सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.