प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील घाणेखुंट येथील गवळीवाडी येथून पोलिसांनी 8 लाख 6 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी अटक केलेल्या तैयब सत्तार मेमन (39, रा. गवळीवाडी-घाणेखुंट) यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुटखा विक्रीप्रकरणात चिपळुणातील एकाचा समावेश असून तो फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत असून त्याच्या अटकेनंतर गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
घाणेखुंट-गवळीवाडी येथील एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने धाड टाकून 8 लाख 6 हजार रुपयांचा एमआरडी व विमल गुटखा जप्त केला.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, घाणेकर, पोलीस शिपाई संकेत गुरव, विनायक येलकर, रूपेश पेढामकर यांचा समावेश होता. या गुटखा विक्रीप्रकरणात चिपळूण येथील पुजारी नामक व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. तैयब मेमन याच्या अटकेनंतर तो फरार झाला आहे. येथील पोलिसांकडून फरारीचा कसून शोध घेण्यात येत आहे. लवकरच त्याच्या मुसक्या आवळू, असा विश्वास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुजित गडदे यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईने बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.