युक्रेनवर आण्विक हल्ल्याचा धोका
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि त्यांचे निकटवर्तीय टॉप सीक्रेट न्युक्लियर बंकरमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. पुतीन सीक्रेट बंकरमध्ये गेल्याने जगात दहशतीचे वातावरण आहे. पुतीन आण्विक अस्त्रांना तैनात करण्याच्या तयारीत असल्याची भीती लोकांना सतावत आहे. पुतीन यांनी युक्रेनवर आण्विक हल्ला केल्यास नाटो देश देखील रशियावर प्रत्युत्तरादाखल कारवाई करू शकतात. पुतीन यांच्या बंकरचे अणुबॉम्ब देखील नुकसान घडवू शकत नाही.
रशियन राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकाऱयांच्या हालचालींवर नजर ठेवल्यावर पुतीन आता पश्चिम सायबेरियाच्या सुरगुट भागात गेल्याचे समजले आहे असा दावा ब्रिटिश शोधपत्रकार च्रिस्टो गोजेव यांनी केला आहे. तर मागील काही दिवसांमध्ये रहस्यमय पद्धतीने गायब राहिलेले रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू हे युराल पर्वतांमध्ये निर्मित ऊफाच्या बंकरमध्ये लपले असल्याचे समजते. शोइगू यांची मुलगी क्सेनिया देखील ऊफा येथे पोहोचल्याचा दावा आहे.

क्सेनियाची ऊफामधील छायाचित्रे अलिकडेच समोर आली होती. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांच्या मुलीने स्वतःचे इन्स्टाग्राम अकौंट लॉक केले आहे. विमानांवर नजर ठेवल्यावर ऊफासाठी अनेकदा उड्डाणे करण्यात आल्याचे समजले आहे. या भागामध्ये अनेक बंकर्स आहेत. पुतीन कुठेतरी अन्य बंकरमध्ये लपलेले आहेत. पुतीन यांच्या विमानांच्या उड्डाणांना अत्यंत गोपनीय ठेवण्यात येत असल्याने त्यांच्या जागेचा खुलासा होऊ शकलेला नाही. परंतु ते सुरगुट येथे गेल्याचे मानले जात आहे.
सुरगुट ही रशियाची तेल राजधानी आहे. राजधानी मॉस्कोपासून हे शहर 2,900 किलोमीटर अंतरावर आहे. अंतिम टप्पा अत्यंत गोपनीय असून तेथे एक विशेष बंकर असून त्यात प्रशासनातील काही उच्चस्तरीय अधिकारी तेथे असण्याची शक्यता असल्याचे गोजेव यांनी म्हटले आहे.
रशियाच्या सैन्याचे प्रमुख देखील एका बंकमधून लढाईचे सारथ्य करत आहेत. ग्रोजेव यांच्या दाव्यांदरम्यान रशियाने युक्रेनवर आण्विक हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. जोपर्यंत आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत नाही तोवर आम्ही अणुबॉम्बचा वापर करणार नसल्याचे रशियाने म्हटले आहे.