प्रतिनिधी/ वास्को :
काल गुरूवारी चौथ्या दिवशी दाबोळी विमानतळावर 96 हवाई प्रवासी उतरले. दुपारच्या वेळी दोन तर सायंकाळी दोन विमानाचे आगमन झाले. परतीच्या प्रवासात चार विमानांतून 126 प्रवाशांनी दिल्लीला, 75 प्रवाशांनी बेंगळूरला तर एका प्रवाशांने म्हैसूरकडे जाण्यासाठी उड्डाण केले.
सोमवारी पहिल्याच दिवशी दाबोळी विमानतळावर केवळ तीन विमाने दाखल झाली होती. मंगळवारी दोन विमानांतून 39 प्रवासी गोव्यात दाखल झाले होते तर बुधवारी तीन विमानातून 122 प्रवासी दाखल झाले.
काल गुरूवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे विमान 40 प्रवाशांसह बेंगळूरहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून 55 प्रवाशांनी बेंगळूरला प्रयाण केले. दुपारी 2.15 वा. दिल्लीहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 29 प्रवाशांसह दाखल झाले. हेच विमान अडीचच्या सुमारास 126 प्रवाशांसह दिल्लीकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर सायंकाळी 5.20 वा. म्हैसूरहून एअर इंडियाचे खास विमान केवळ चार प्रवाशांसह दाखल झाले. हेच विमान एका प्रवाशाला घेऊन म्हैसुरकडे मार्गस्थ झाले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बेंगळूरहून एअर एशियाचे विमान 23 प्रवाशांसह दाखल झाले. याच विमानातून 20 प्रवाशांनी बेंगळूरकडे प्रयाण केले. त्यामुळे चौथ्या दिवशी एकूण 96 प्रवासी गोव्यात हवाईमार्गे दाखल झाले.
आज रोममधून 200 गोमंतकीय खलाशी दाखल होणार
दरम्यान, आज शुक्रवारी पहाटे रोममधून येणाऱया विमानाने गोव्यातील 200 खलाशी दाबोळी विमानतळावर उतरणार असल्याची माहिती मिळाली. त्यांना गोव्यात विविध ठिकाणी कॉरन्टाईन करण्यात येणार आहे. या पूर्वी इटलीहून 414 गोमंतकीय खलाशी दाबोळीत उतरले होते. त्यांचा आता कॉरन्टाईनचा कालावधीही पूर्ण झालेला असून वास्कोत जवळपास 160 खलाशांना विविध हॉटेल्समध्ये कॉरन्टाईन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांत त्यांना मुक्त करण्यात आले आहे.
350 रशियन पर्यटकांचे मायदेशी प्रयाण
दाबोळी विमानतळावरून 350 रशियन पर्यटकांनी काल गुरूवारी सायंकाळी मायदेशी प्रयाण केले. आतापर्यंत जवळपास आठ हजारांहून अधिक विदेशी पर्यटकांनी गोव्यातून मायदेशाकडे प्रयाण केले आहे.
गोव्यात लॉकडाऊननंतर अडकून पडलेल्या हजारो विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यास प्रारंभ झाल्यानंतर आतापर्यंत 40 खास हवाई सेवांव्दारे जवळपास आठ हजारांहून अधिक विदेशी पर्यटकांना पाठवण्यात आलेले आहे. काल गुरूवारी दुपारी रशियन रिलीफ फ्लाईट एफव्ही 6883 हे विमान दाबोळी विमानतळावर दाखल झाले. सायंकाळी 4.30 वा. या विमानातून 350 पर्यटकांनी रशियाला प्रयाण केल्याची माहिती दाबोळी विमानतळ सुत्रांकडून मिळाली.