प्रतिनिधी / सातारा :
व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात दीड महिन्याच्या मुलीला ओलीस ठेवणाऱ्या साताऱ्यातल्या खासगी सावकाराच्या ताब्यातून पोलिसांनी मुलीची सुटका केली. या प्रकाराची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ढोणे कॉलनीत कुचेकर कुटुंबियांची भेट घेवून त्यांची आपुलकीने चौकशी केली. दरम्यान, नगरसेवक रवी ढोणे यांनीही त्या कुटुंबियास आधार दिला. पोलिसांना या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा आणि त्या खासगी सावकाराच्या मुसक्या आवळा, असे आदेश देसाई यांनी दिले.
साताऱ्यातल्या सदरबाजार येथील खासगी सावकार बाबर व त्यांची पत्नी या दोघांनी मंगळवार पेठेतल्या ढोणे कॉलनीत राहणाऱ्या कुचेकर याला व्याजाने दिलेल्या पैशापोटी चक्क दीड महिन्याच्या मुलीला ओलीस ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची दाहकता पाहुन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सह पोलीस अधीक्षक आँचल दलाल व सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांनी त्या मुलींची सुटका करुन कुचेकर कुटुंबियांच्या हवाली केले. याबाबतची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना समजताच आज सकाळी त्यांनी कुचेकर कुटुंबियांच्या घरी भेट दिली. यावेळी नगरसेवक रवी ढोणेही उपस्थित होते. कुचेकर कुटुंबियांनी बाबर याने केलेल्या अन्यायाचा पाढाच त्यांच्याजवळ वाचला. त्यावेळी कुचेकर कुटुंबियांनी रात्री बाळाची कोरोना चाचणी करत असताना बाबर दाम्पत्य जीवे मारण्याची धमकी देत होते. शिवीगाळ करत होते, असे त्यांनी कथन केले. त्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांना या प्रकरणाबाबत सोक्षमोक्ष लावण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान, नगरसेवक रवी ढोणे यांनीही कुचेकर कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन दिले.