पार्लर्स, सलून सुरू झाली असली तरी तिथे जायला अजूनही मन धजावत नाही. तिथली स्वच्छता, निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना याबाबत आपल्याला शंका वाटते. कोरोनाच्या धास्तीमुळे बर्याच जणी पार्लरमध्ये जाणं टाळत आहेत. पण सणउत्सव म्हटले की नटणं आलंच. खास प्रसंगी चेहरा तजेलदार आणि उजळ दिसायला हवा. फेशियल किंवा क्लिन अपसाठी पार्लरची वाट धरायची नसेल तर तुम्ही काही घरगुती फेसपॅक वापरू शकता. या पॅक्समुळे त्वचेला आवश्यक ते पोषण मिळेल आणि सणाचा आनंद द्विगुणित होईल.
* मुलतानी मातीच्या लाभांविषयी आपण जाणतो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये मुलतानी मातीचा वापर होतो. मुलतानी मातीमध्ये थोडं गुलाबपाणी मिसळून पॅक तयार करा. हा पॅक चेहर्याला लावा वाळल्यावर धुवून टाका. आठवडय़ातून दोन वेळा हा उपाय करता येईल.
*फेशियल सारखा तजेला मिळवण्यासाठी बेसन, काकडीचा रस आणि दही वापरून पॅक तयार करा. प्रत्येकी दोन चमचे बेसन आणि काकडीचा रस घ्या. त्यात चमचाभर दही घाला. पेस्ट तयार करा. हा पॅक चेहर्याला लावून 15 मिनिटांनी धुवून टाका.
* अंडय़ातला पांढरा भाग बहुगुणी आहे. यामुळे त्वचेला चांगलं पोषण मिळतं. तसंच रोमछिद्रंही स्वच्छ होतात. अंडय़ाचा पांढरा भाग चेहर्याला लावून वाळल्यावर धुवून टाका.
* चमकदार त्वचेसाठी दोन चमचे बेसनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून पॅक तयार करा. लिंबामुळे त्वचेवरील जंतू नष्ट होतील. तसंच घाणही स्वच्छ होईल.
* बेसनमध्ये साय, लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घालून पॅक तयार करा. हा पॅकही खूप उपयुक्त आहे.