प्रतिनिधी/कोल्हापूर
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी चेअरमन रवींद्र आपटे यांनी आज, मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते निवडणूक लढवणार की नाही यावर उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी आपला अर्ज दाखल केल्याने ते निवडणुकीच्या मैदानात असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे आपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्याच्यासोबत माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके, संचालक विश्वास जाधव, चेतन नरके, प्रकाश चव्हाण, विश्वनाथ अण्णा करंबळी, नामदेवराव नार्वेकर अंकुश पाटील, इतर मान्यवर उपस्थित होते.
गोकुळ निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. तर, गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस उरले आहेत.यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या करवीर प्रांत कार्यालयातील गोकुळ निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या दालनाबाहेर आणि इमारतीच्या परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. यामुळे याठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमाचा फज्जा उडाला आहे.