वार्ताहर / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव गावामध्ये पुणे-बंगलोर महामार्गावरील बस स्टॉप वर असलेल्या एस एस मोबाईल शॉपी मध्ये भुरट्या चोरांनी सोमवारी रात्री मोबाईल शॉपी मधील मोबाईलवर डल्ला मारला असून यामध्ये लाखो रुपयांची चोरी केली आहे. सकाळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी चोरीचे ठिकाणी पंचनामा करून या चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.
गेल्या एक वर्षापासून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त न झाल्याने यांचा चांगलाच चेव चढलेला दिसत आहे. दर पंधरा वीस दिवसाला गावांमध्ये अशा भुरट्या चोऱ्या सातत्याने होत आहेत. या चोरांना वेळीच आळा बसला तर पुढे होणाऱ्या मोठ्या घटना नक्कीच थांबणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी गोकुळ शिरगाव परिसरातील ग्रामस्थांच्या कडून होत आहे. हे चोर मोबाईल शॉपीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या चोरांचा शोध घेणे पोलिसांना सोपे झाले आहे. लवकर या चोरांचा बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा नागरिकांच्या कडून व्यक्त केली जात आहे. या चोरांना वेळीच धडा शिकवला तर नक्कीच या परिसरातील होणाऱ्या भुरट्या चोऱ्या थांबतील.