वार्ताहर / गोकुळ शिरगाव
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वरील सुदर्शन पेट्रोल पंप गोकुळ शिरगाव येथून सुरू होणाऱ्या उड्डान फुलाचे अतिवृष्टीमुळे निक्षेपण होऊन भराव खचू लागल्याने पूल व रस्ता कमकुवत बनलेला होता. या कमकुवत होणाऱ्या उड्डाणपुलाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुलाच्या संरक्षणासाठी दगडी पिचिंगचे काम सुरू केले आहे.
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील पुणे-बेंगलोर, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ येथे मोठ्या प्रमाणात भराव टाकून उड्डाण पूल निर्माण केला असून या उड्डाण पुलामुळे गोकुळ शिरगाव पूर्व व पश्चिम अशा दोन भागांत विभागलेले आहे. या पुलांमुळेच दोन्ही भागांचा एकमेकांशी संपर्क होत असतो. सुदर्शन पेट्रोल पंपापासून गोकुळ शिरगाव प्रवेश कमानी पर्यंत भराव टाकून सदर उड्डाणपूल निर्माण केले असून गेल्या दोन वर्षापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भराव टाकलेला भाग खचत असून त्यामुळे उड्डाण पुलावरील रस्त्याला व उड्डाण पूलाला धोका निर्माण झालेला होता. त्याची वेळीच दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने पिचिंगचे काम सुरु केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.