प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात घरफोड्यांचे सत्र वाढले असून, शहरासह उपनगरातील घरांना चोरट्यांनी टार्गेट केले आहे. दि. 5 रोजी भरदिवसा गोडोलीतील एका बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरटय़ाने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी तक्रारदार संदीप रामचंद्र कदम (वय 41, रा. 652, अ, गोडोली, शिवदर्शन सोसायटी, विलासपूर, गोडोली, सातारा) हे घराला कुलूप लावून गेले होते. त्यावेळी दिवसभरात अज्ञात चोरटय़ाने मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम 40 हजार असा एकूण 73 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करत आहेत.