इचलकरंजी / प्रतिनिधी
अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे दुचाकीवरून गोवा बनावटीच्या दारुची वाहतुक करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दोन दुचाकी व गोवा बनावटीची दारु असा १ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इचलकरंजी दारु उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी दुपारी केली.
चेतन सर्जेराव बडगर (वय १९ ), संकेत बाळासो बंडगर ( वय २३) (दोघे रा. शिरटी, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईमध्ये दारु उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, उपाआयुक्त वाय. एम. पवार, कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख, उपाअधीक्षक बी. आर. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी दारु उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पांडूरंग पाटील, दुय्यम निरीक्षक वर्षा पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक राहुल गुरव, जी. एच. हजारे, जवान विजय माने, सुभाष कोले, विलास पवार आदींचा सहभाग होता.
इचलकरंजी दारु उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पाटील यांना अब्दुललाट येथे गोवा बनावटीच्या दारुची वाहतुक होणार असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरून या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी सुरु केली. यावेळी चेतन सर्जेराव बडगर, संकेत बाळासो बंडगर हे दोन दुचाकीस्वार गोवा बनावटीच्या दारुची वाहतुक करताना मिळून आले. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह गोवा बनावटीची दारु असा सुमारे १ लाख ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.