क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज शॉन टेटने गोवा क्रिकेट संघटनेने दिलेल्या सीनियर संघ क्रिकेट प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव फेटाळला आहे. गेली काही महिने जीसीएचा एक पदाधिकारी शॉन टेटच्या एजंटकडे सातत्याने संपर्कात होता. मात्र आता शॉनच्या नकाराने जीसीए आता प्रशिक्षकपदाच्या नेमणुकीबाबत बॅकफूटवर आली आहे.
गोवा क्रिकेट संघटना कित्येक महिन्यापासून शॉनच्या सतत संपर्कात होती आणि सर्व सोपस्कार पूर्ण होण्याच्या मार्गावर होते, यास जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी दुजोरा दिला. शॉन टेट, त्याची भारतीय पत्नी आणि मुलगी इंग्लंडमध्ये स्थायिक होणार आहे. तसेच अन्य देशाकडूनही भरगच्च करार प्रस्ताव आल्याने शॉनने जीसीएने दिलेला प्रस्ताव मान्य केला नसल्याचे कळते.
शॉन टेट आणि भारताचा माजी क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर हे प्रशिक्षकापदासाठी जीसीएच्या रडारावर होते. जीसीए सतत या दोघांच्या संपर्कातही होती. भारताचा जावई बनलेल्या शॉनकडे ओवरसीस इंडियन सिटीजनशिप असून मुंबईत वास्तव्यास असल्याने जवळच असलेल्या गोव्यात येऊन जीसीए सीनियर क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा घेईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती आता फोल ठरली आहे. जीसीएपेक्षा शॉनला कॅनडा आणि अबू धाबीत प्रशिक्षकपदाची चांगली ऑफर आल्याने जीसीएची ऑफर आणि पुढे त्याच्या एजंटने चर्चाही करणे सोडले आहे. माशूम सिंघा या भारतील स्वीमसूट मॉडेलशी 2014 मध्ये लग्न केलेला शॉन टेट गोव्यात स्थायिक होण्यास उत्सुक होता. यामुळे त्याच्या एजंटने गोवा क्रिकेट संघटनेशी शॉनच्या प्रशिक्षक होण्याबाबत संपर्क साधल्यानंतर जीसीए सुद्धा या बाबत सिरीयस होती. करार होण्याच्या मार्गावर असतानाच शॉनने भरगच्च करार पुढे असल्याने जीसीएला ठेंगा दाखविला आहे, असे मुंबईतील सूत्रांनी सांगितले.