गोव्यात अलीकडच्या काळात एका पक्षातून दुसऱया पक्षात उडी घेण्याचे सत्र भरपूर गाजलेले असून विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून त्याला विलक्षण गती प्राप्त झालेली आहे. 40 सदस्यांच्या विधानसभेतील 60 टक्के सदस्यांनी म्हणजे 24 आमदारांनी पाच वर्षांत पक्षांतर केलेले आहे. ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडाआर) यांनीही आपल्या अहवालातून यावर प्रकाश टाकताना गोव्याने भारतीय लोकशाहीत नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे म्हटले आहे
इतक्मया मोठय़ा प्रमाणात पक्षांतर भारतात दुसरीकडे कुठेच घडलेले नसून मतदारांनी दिलेल्या कौलाविषयीचा अनादर स्पष्टपणे त्यातून दिसून येतो, असे सदर संघटनेने म्हटले आहे. यात 2019 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्यासह दहा आमदारांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये केलेला प्रवेश सर्वांत जास्त गाजला. जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, फिलीप नेरी रॉड्रिग्स, विल्प्रेड डिसा, क्लाफासियो डायस, आंतोनियो फर्नांडिस, नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस व बाबूश मोन्सेरात यांचा त्यात समावेश राहिला. मगोच्या दीपक पाऊसकर आणि बाबू आजगावकर यांनी याच कालावधीत भाजपमध्ये प्रवेश केला. वरील साऱयांपैकी विल्प्रेड डिसा यांनी भाजप सोडून नुवे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, तर सार्वजनिक बांधकाममंत्री राहिलेले दीपक पाऊसकर व उपसभापती राहिलेले इजिदोर फर्नांडिस यांनी भाजपने उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून लढण्याचे ठरविले आहे.
जयेश साळगावकर यांनी गोवा फॉरवर्डमधून तसेच माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो काँग्रेसमधून, तर माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव राष्ट्रवादी काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये पोहोचले. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे काँग्रेसमधून तृणमूलमध्ये गेल्यानंतर आता अपक्ष म्हणून उतरत आहेत. अपक्ष आमदार म्हणून मागील वेळी निवडून आलेले रोहन खंवटे व गोविंद गावडे भाजपमध्ये, तर प्रसाद गावकर काँग्रेसमध्ये गेले. भाजपचे प्रवीण झांटय़े मगोमध्ये, मायकल लोबो व कार्लुस आल्मेदा काँग्रेस पक्षामध्ये, तर एलिना साल्ढाणा या आपमध्ये पोहोचल्या.