क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोव्याचा प्रतिभावंत आणि होतकरू शरीरसौष्ठवपटू ओंकार देसाई याचे काल सकाळी मुंबईत निधन झाले. कुंकळळी- भिंवसा येथील ओंकार मागील सहा महिने कॅन्सरशी झुंज देत होता. लढवय्या असलेल्या ओंकारवर मागील सहा महिने गोव्यातच उपचार करण्यात येत होते. रविवारी उपचारासाठी त्याला मुंबईला त्याला नेण्यात आले होते, मात्र काल सकाळीच त्याची प्राणज्योत हरपली.
घरात एकुलता एक असलेल्या 24 वर्षीय ओंकारने आपल्या पिळदार शरीरयष्टीने स्पर्धात्मक शरीरसौष्ठव स्पर्धेत नाव कमावलं होते. कुंकळळीतील अवर लेडी ऑय हॅल्थ हायस्कूल ते सीईएस कॉलेज असा त्याचा शिक्षणाचा प्रवास राहिला. 2015 मध्ये गोवा विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत 75 किलोवरील गटात रौप्यपदक मिळविलेल्या ओंकारने त्यानंतर गोव्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत नियमित भाग घेतला आणि पदकेंही मिळविली.
मडगावमध्ये झालेल्या दामबाब श्री अखिल गोवा पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत 75 किलोवरील वजनी गटात चांगली कामगिरी केल्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये ओंकारने आपल्या खडतर मेहनतीच्या बळावर गोवा विद्यापीठाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स‘ हा प्रतिष्ठतेचा किताब मिळविला. त्याच वर्षी चौगुले कॉलेजने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन पातळीवरही ‘मि चौगुले‘चा किताबही प्राप्त केला.
गोव्यात होणाऱया प्रत्येक शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेताना 75 किलोवरील वजनीगटात ओंकारने शेवटपर्यंत आपला दबदबा कायम राखला. ओंकार एक गोव्याचे आशास्थान होते. तो नेहमीच पदकांसाठी आसुसला होता. त्याच्या जाण्याने राज्यातील शरीरसौष्ठव खेळाचे मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया गोवा शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे.