आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील यांचे उद्गार : मच्छे क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
मच्छे येथील क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हाफपीच क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. संघटनेच्यावतीने त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कुडतूरकर ग्राऊंड (दुर्गा मैदान) येथे या स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये एकूण 75 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगावसह लातूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, हल्याळ, दांडेली, बागलकोट, खानापूर येथील संघांचा सहभाग होता. या स्पर्धेवेळी महिलांसाठी विशेष क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये बेळगाव रेड या महिला संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर बेळगाव ब्ल्यू हा संघ उपविजेता ठरला.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील यांनी महिलांना विशेष असे मार्गदर्शन केले. अनुजा पाटील या सध्या भारतीय क्रिकेट संघात खेळत आहेत. त्यांनी आतापर्यंत 50 सामने खेळले आहेत तर 48 बळी मिळविले आहेत. तसेच आयसीसी वुमेन टी-20 वर्ल्डकपमध्येही त्या खेळलेल्या आहेत. आशिया कप स्पर्धेतही त्या तीन वेळा सहभागी झाल्या होत्या. तसेच महिला आयपीएलमध्ये दोन वेळा सहभाग दर्शविला आहे. त्यांचे शिक्षण बीए झालेले आहे. त्यांनी 2011 ते 2020 या काळात इंडिया वुमेन चॅलेंजर ट्रॉफी एकदिवशीय आणि टी-20 ट्रॉफी खेळल्या आहेत. तसेच 2009 ते 2016 यामध्ये वेस्ट झोन सिनियर वुमेन व 2009 ते 2020 यामध्ये महाराष्ट्र वुमेन लिस्ट ए यामध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच विविध सामन्यांमध्ये त्यांनी कप्तानपदही भूषविले आहे.
अनुजा पाटील यांचा मच्छे क्रिकेट क्लबचे अध्यक्ष कृष्णा जैनोजी, अपेक्षा देसाई, श्रेया सव्वाशेरी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक तरनाळे, असद हुजदार, विवेक भादवणकर, संतोष जैनोजी, गजानन जैनोजी आदी मान्यवर उपस्थित होते.
युवराज पाटील यांनी अनुजा पाटील यांची विशेष मुलाखत घेऊन त्यांच्या क्रिकेटमधील प्रवासाविषयी माहिती करून घेतली. बेळगावमध्ये आल्यानंतर कसे वाटले, या प्रश्नाला अनुजा यांनी ‘बेळगावमध्ये आल्यानंतर येथील वातावरण मला खूपच भावले. तसेच मच्छेसारख्या ग्रामीण भागात महिलांसाठी इतक्मया मोठय़ा प्रमाणात क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली, याबद्दल समाधान व्यक्त केले. अनुजा पाटील यांची क्रिकेट सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटपासून झाली. माझ्या घरी माझे वडील, काका, मामा क्रिकेटर असल्यामुळे आपल्याला यामध्ये करिअर करण्यासाठी कोणतीच अडचण आली नाही, असेही त्यांनी सांगितले. रांची येथील सामन्यात पहिल्यांदाच त्यांना ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार मिळाला. यावेळी आपल्या घरातील सर्व मंडळी खूप आनंदी झाली होती, असे सांगितले. तसेच युवराज सिंग आणि विराट कोहली हे त्यांचे आदर्श खेळाडू असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी कोरोनाकाळात इतर खेळाडूंनाही मदत केली आहे. स्त्राrभूण हत्या थांबली पाहिजे तसेच मुलगा-मुलीत भेदभाव करू नये, मुलींनाही उज्ज्वल घडविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
कुंदानगरीचे कौतुक
बेळगावमध्ये माझ्या खूप आठवणी आहेत. मी कणबर्गी रोडवरील केएससीए स्टेडियमवरही खेळले आहे. त्यावेळी मी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सर्वसामान्यांचे महाबळेश्वर म्हणून बेळगावची ओळख आहे आणि खरोखरच इथले वातावरण मला खूप भावले आहे. बेळगावला आल्यानंतर येथील सुप्रसिद्ध कुंदा मी आवडीने खाते, असेही त्यांनी सांगितले.