हुबळी पोलिसांची कारवाई : 16.44 लाखांच्या दागिन्यासह 3.56 लाख रोख रक्कम जप्त
वार्ताहर/ हुबळी
दागिने पॉलिश करून देण्याचा बहाना करीत फसवणूक करीत असलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात हुबळी पोलीस यशस्वी झाले आहेत. तसेच त्याच्याकडून 16.44 लाख किंमतीचे दागिने आणि 3.56 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सुनील मोहन पत्तार (रा. अक्षय कॉलनी, हुबळी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, हुबळी तालुक्यातील उणकल संतेबैल येथे सुनीलचे गायत्री ज्युवेलर्स नामक दागिन्यांचे दुकान होते. दरम्यान, त्याठिकाणी त्याने दागिने पॉलिश करून देण्याच्या बहान्याचे अनेकांची फसवणूक केली होती. तसेच ग्राहकांचे 20 लाखांचे दागिने आणि 5 लाख रुपये रोख रक्कमही लांबविले होते. याबाबत विद्यानगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात होती.
घटनेचा तपास हाती घेतलेल्या विद्यानगर पोलीस स्थानकाचे पीआय आनंद वनकुद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली पीएसआय शिवानंद बन्नीकोप्प, एएसआय बसवराज कोटबागी, हवालदार बसवराज कित्तूर, बी. व्ही. चिक्कबासूर, यल्लप्पा शेंडगे, एम. एन. गुरम्मानवर यांनी योग्य सापळा रचून संशयित सुनील पत्तार याला ताब्यात घेण्यात यशस्वी झाले.