अविनाश पोतदार यांचे गौरवोद्गार : घरकुल-22 ची शानदार सांगता : प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

प्रतिनिधी /बेळगाव
प्रत्येकाला वाटते आपले लहानसे का होईना पण घर असावे, हे स्वप्न सत्यात उतरविण्याचे कार्य तरुण भारत घरकुल या प्रदर्शनाने मागील अनेक वर्षांपासून केले आहे. मागील काही वर्षांत या प्रदर्शनाने मोठी झेप घेतली असून यावर्षी 170 हून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले. सुसूत्र नियोजन, कार्यक्रमांची आखणी, स्टॉलधारकांचे समाधान यामुळेच या प्रदर्शनाला बेळगावसह इतर राज्यांमधूनही उत्तम प्रतिसाद मिळतो. या प्रदर्शनामुळे अनेकांच्या घरांचे स्वप्न सत्यात उतरले असल्याचे गौरवोद्गार रोटरीचे माजी प्रांतपाल व उद्योजक अविनाश पोतदार यांनी काढले.
तरुण भारत पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘घरकुल-2022’ प्रदर्शनाची बुधवारी शानदार सांगता झाली. सांगता सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश पोतदार बोलत होते. व्यासपीठावर तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, इव्हेंट चेअरमन आनंद चौगुले, सी. आर. पाटील, गोल्ड प्लस फ्लोट ग्लासच्या एचआर कीर्ती हिरेमठ, अल्ट्राटेक सिमेंटचे मार्केटिंग प्रमुख श्रीवास्तव, तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर उपस्थित होते.

कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम पाटील यांनी घरकुल प्रदर्शनाविषयी माहिती देत मागील सहा दिवसांत झालेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर म्हणाले, घरकुल प्रदर्शनामागे तरुण भारत भक्कमपणे उभा आहे. यावर्षी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या परिसरातूनही नागरिकांनी हजेरी लावल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी स्टॉलधारकांचे आभार मानत यावषी स्टॉलची संख्या दुपटीने वाढल्याची माहिती दिली. स्टॉलधारक आनंद हेडा यांनी प्रदर्शनामुळे अनेक ग्राहक जोडले गेले, असे सांगितले. वीरधवल उपाध्ये म्हणाले, केवळ बेळगावच नाही तर हासन, गोवा, चिक्कमंगळूर, महाबळेश्वर येथील भागात साहित्यासाठी चौकशी आल्याचे सांगितले. महेश अनगोळकर यांनी उद्योजक अविनाश पोतदार यांचा परिचय करून दिला. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वैजनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्नोफेस्ट घेण्यात आला. टेक्नोफेस्टमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच घरकुल-2022 यशस्वी करण्यामध्ये हातभार लावलेले तरुण भारत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी एम. स्टाईल ग्रुपच्या सदस्यांनी हिंदी, मराठी व कन्नड गीतांवर एकाहून एक सरस डान्स सादर करत वाहव्वा मिळविली.
खाद्यपदार्थांचा आस्वाद
घरकुल प्रदर्शनात खाद्यपदार्थांच्या स्टॉलना मोठी गर्दी झाली होती. चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणाऱयांची संख्या सर्वाधिक होती. जोळ्ळद रोट्टी, मिरची भजी, भेळ, शेवपुरी, शोरमा, कोल्हापुरी पाणीपुरी, मसाला चहा, दावणगेरी डोसा, चायनिज खाद्यपदार्थ यासह आईस्क्रीम, केक खाण्यासाठी बुधवारी मोठी गर्दी झाली होती.
सांगता समारंभादिवशी तुफान गर्दी
गृहनिर्माण क्षेत्र एकाच छताखाली पाहण्याची संख्या घरकुल-22 प्रदर्शनात नागरिकांना मिळाली. सिमेंट, फर्निचर, इंटेरिअर, फायनान्स, टाईल्स, इलेक्ट्रीकल, रिअल ईस्टेट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्लायवूड, आर्किटेक्चर, हार्डवेअर, लाईट्स व इतर साहित्याचे स्टॉल्स मांडले होते. गृहनिर्माण क्षेत्रातील नामवंत कंपन्यांनी आपल्या स्टॉल्सच्या माध्यमातून उत्पादनांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शनाला भेट देणाऱया नागरिकांना दररोज लकी ड्रॉद्वारे बक्षिसांचे वितरण केले जात होते.
सर्वोत्कृष्ट स्टॉलधारकांचा सत्कार
घरकुल-2022 या प्रदर्शनात आकर्षक पद्धतीने मांडणी केलेल्या स्टॉलधारकांचा सत्कार करण्यात आला. लहान गटात प्रथम सनशाईन, द्वितीय युनिक, तृतीय मोदीवेल, मध्यम गटात प्रथम हेडा प्लायवूड, द्वितीय सेंट गोबियन, तिसरा श्री ग्लास, मोठय़ा गटात प्रथम श्रीराम इनोव्हेशन, द्वितीय क्लासिक फर्निटो, तृतीय मिदोरी यांनी मिळविला. या सर्व स्टॉलधारकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.