टिळकवाडीतील रॉय रोड परिसरात एकाच गल्लीत आढळले 14 कोरोनाबाधित : महानगरपालिकेकडून परिसर सीलडाऊन
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने घरोघरी जावून कोरोनाबाधितांची माहिती घेण्यात येत आहे. मात्र कोरोनाबाधित घरामध्ये उपचार घेत असल्याने अन्य सदस्यांना संसर्ग होत असल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. टिळकवाडी भागातील रॉय रोड परिसरातील तीन घरांमध्ये एकाच गल्लीत 14 कोरोनाबाधित असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने परिसर कंटेन्मेंट करण्यात आला.
टास्क फोर्सच्या माध्यमातून घरोघरी जावून कोरोनाबाधितांची माहिती घेण्यात येत आहे. महापालिकेचे अधिकारी व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून सदर कर्मचाऱयांकडे वॉर्डस्तरीय पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे घरोघरी जावून कोरोनाबाधित तसेच कोणती व्यक्ती आजारी आहे का? याची विचारणा करण्यात येत आहे. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोना चाचणी करण्याची सूचना करण्यात येत आहे.
तसेच आवश्यकता भासल्यास आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना माहिती देऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. एका घरात दोनपेक्षा जास्त कोरोनाबाधित असल्यास त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. दोनपेक्षा जास्त रुग्ण असलेल्या घराला कंटेन्मेंट करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होत आहे. काही
ठिकाणी घरातील सर्वच सदस्य कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास येत आहे.
घरोघरी नागरिकांचा सर्व्हे
शहरात विशेषतः टिळकवाडी, हिंदवाडी, सदाशिवनगर, तसेच विविध उपनगरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढती आहे. टिळकवाडीतील रॉय रोड परिसरात तीन घरांमध्ये 14 कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आल्याने हा परिसर सीलडाऊन करण्यात आला. तसेच परिसरातील घरोघरी जावून नागरिकांची माहिती घेण्यात आली. घरोघरी जावून माहिती घेण्यात येत असल्याने कोरोनाच्या प्रसाराला ब्रेक लागत आहे.
शेजारी राहणाऱयांनादेखील कोरोनाबाधितांची माहिती मिळत नसल्याने कोरोनाची बाधा होण्याचा धोका होता. हा प्रकार रोखण्यासाठी कंटेन्मेंट करण्यासह घरावर स्टिकर लावण्यात येत असल्याने नागरिक सावध होत आहेत. पण बहुतांश कोरोनाबाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात बेड मिळत नसल्याने तसेच खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने घरात उपचार घेत आहेत. मात्र यामुळे घरातील अन्य सदस्यांना संसर्ग होत असल्याचे टास्क फोर्स समितीच्या निदर्शनास आले आहे.