कोल्हापूर / प्रतिनिधी
पालकमंत्री सतेज पाटील घरी आले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य होते. याचा अर्थ मी त्यांना पाठिंबा दिला असा होत नाही. जिल्ह्याच्या राजकारणात महादेवराव महाडिक हेच माझे दैवत आणि नेते आहेत अशी स्पष्ट भूमिका आजरा कारखान्याचे माजी चेअरमन अशोक चराटी यांनी आज मांडली.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अंतिम टप्प्यात पाठिंबा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. अशातच एकमेकांचा पाठिंबा काढून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. याच दरम्यान आजरा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोक चराटी यांनीही गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला पाठिंबा दिलेला आहे.
जिल्ह्यामध्ये महादेवराव महाडिक हेच माझे नेते आहेत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी याच बैठकीत मांडली. अशोक चराटे यांची ही भूमिका विरोधी आघाडीला जबर धक्का देणारी आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी चराटी यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. यावेळी अशोक चराटी यांनी पाठिंबाही जाहीर केला. आता दोनच दिवसात त्यांनी ऐनवेळी भूमिका बदलली पाठिंब्याबाबत घुमजाव करत सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या या भूमिकेमुळे आजरा तालुक्यातील समिकरण किमान गोकुळ मध्ये तरी सत्ताधारी गटाला बळ देणारे ठरले आहे, असे मानले जात आहे. हॉटेल पंचशील येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
तत्पूर्वी, महादेवराव महाडिक, आमदार पी एन पाटील माजी खासदार धनंजय महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आमदार संजय बाबा घाटगे, खासदार राजू शेट्टी यांची बंद खोलीत संयुक्त बैठक झाली. यानंतर शेट्टी आणि चराटी यांनी भूमिका जाहीर केल्या.
यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जनार्दन पाटील, भाजपा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.